Viral Video Army Dog Zoom: जम्मू काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात दोन दहशतवाद्यांना पकडून देणारा लष्करी श्वान ‘Zoom’ याचे आज निधन झाले. चिनार युद्ध स्मारकावर लेफ्टनंट जनरल एडीएस औजला यांनी झूमला आदरांजली वाहिली. या आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजेच १० ऑक्टोबरला ओप तांगपावा येथे झालेल्या एका दहशतवादी हल्ल्यात झूमला दोन गोळ्या लागल्या होत्या मात्र त्यानंतरही तो जिगरीने लढत राहिला. दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात त्याने मोलाचे योगदान दिले. या हल्ल्यानंतर झूमची प्रकृती गंभीर होती व आज त्याने उपचारादरम्यान प्राण सोडला. झूमच्या पराक्रमाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

प्राप्त माहितीनुसार अनंतनागमधील ऑपरेशन दरम्यान, दक्षिण काश्मीर जिल्ह्यातील तांगपावा भागात अतिरेक्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाली होती. ज्यानंतर लष्कराने झूम श्वानाला शोध मोहिमेसाठी धाडले. झूमने दहशतवाद्यांचे अचूक स्थान ओळखत सैन्याला ऑपरेशनसाठी मदत केलीच पण त्यानंतरही एका दहशतवाद्याला पार फरफटत घराबाहेर काढून त्याने चावा घेतला. या सगळ्यात झूमला गोळ्या लागल्या. रक्तस्त्राव होत असतानाही झूमने आपला लढा कायम ठेवला. झूमच्या लढ्यामुळे लष्कराला लश्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे.

पाहा झूमचा लढा

दरम्यान अतिरक्तस्राव झाल्याने झूम घटनास्थळी बेशुद्ध झाला व त्याला श्रीनगरमधील लष्करी पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. आज सकाळी ११ वाजून मिनिटांनी झूमची मृत्यूशी झुंज संपुष्टात आली व त्याने देह त्याग केला.

विविध स्तरातून झूमच्या या योगदानाचे कौतुक होत आहे तसेच त्याला श्रद्धांजली वाहिली जात आहे. अवघ्या दोन वर्षाच्या झूमने आजपर्यंत काश्मीरमधील अनेक दहशतवादी कारवाया उलथून लावण्यात सैन्याला मदत केली होती.