सोशल मीडियवर सध्या एका पोलीस हवालदाराला मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हवालदार एसपी कार्यालयात ड्युटीवर असतानाच त्याला ही मारहाण करण्यात आली आहे. तर मारहाण करणारे त्याच्या सासरची लोकं असल्याची माहिती समोर आलेय. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये पोलीस हवालदाराच्या पत्नीसह त्याच्या मेहुण्या आणि सासू मारहाण करताना दिसत आहेत.
आणखी वाचा- नशिबाचा खेळ! नवऱ्याने लॉटरीत जिंकलेले एक कोटी घेऊन बायकोचा पोबारा; प्रियकराकडे गेली अन्…
मिळालेल्या माहितीनुसार, हा सर्व प्रकार झाशीमधील पोलिस अधीक्षकांच्या (SP) कार्यालयाच्या परिसरात घडला आहे. प्रदीप यादव असं मारहाण झालेल्या पोलीस हवालदाराचं नाव आहे. प्रदीपचे कानपूरमधील ग्रेसी नावाच्या मुलीशी २०१७ मध्ये लग्न झालं होतं. लग्नानंतर या पती-पत्नीमध्ये काही वाद सुरु होता. शिवाय मारहाणीच्या घटनेच्या दोन दिवस आधीच पती प्रदीप हा आपणाला हुंड्यासाठी त्रास देत असल्याची तक्रार ग्रेसीने कानपूर पोलिसांत दिली होती.
दरम्यान, या घटनेबाबतची तक्रार घेऊन प्रदीपची बायको आपल्या माहेरच्या लोकांसह एसपी ऑफिसमध्ये आली होती. याचवेळी ग्रेसीचा नवरा प्रदीप हा कार्यालयाच्या आवारात दिसताच सासरची मंडळी त्याच्यावर तुटून पडली. प्रदीपच्या पत्नीसह सासु आणि मेहुण्यांनी त्याला मारहाण करायला सुरुवात केली. या मारहाणीमध्ये हवालदाराची कपडे फाटल्याचंही व्हिडीओमध्ये दिसतं आहे.
दरम्यान, सासूसह बायकोच्या मारहाणीला घाबरलेल्या हवालदाराने एसपी ऑफिसमध्ये धूम ठोकली, पण सासरच्या मंडळीने त्याचा पाठलाग करत पुन्हा मारहाण करायला सुरुवात केली. या घटनेमुळे पोलिसांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.
पोलिसच हुंड्यासाठी बायकोला त्रास देत असतील, तर पीडितेने कोणाला जाब विचारायचा? अशा दोन्ही बाजूने नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.सोशल मीडियावर हा व्हिडीओ अनन्या मिश्रा नावाच्या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. “झाशीच्या एसपी कार्यालयातील कायदा व सुव्यवस्थेचे हाल पाहा, हवालदारालाच मारहाण होत आहे” असं कॅप्शन व्हिडीओ पोस्ट करताना देण्यात आलं आहे.