पत्रकारांना अनेक गोष्टींना सामोरं जाव लागतं. ठार मारण्याच्या धमक्या, मारहाण हे प्रकार तर नेहमीचेच. समाजात घडणाऱ्या अनेक गोष्टींचं आणि समस्यांचं खोलवर ज्ञान असल्याने पत्रकार हा संवेदनशीलही असतो. अनेकदा एखादी बातमी करत असताना पत्रकाराच्या भूमिकेतून बाहेर येत कार्यकर्त्याच्या भूमिकेत यावं लागतं.
या पत्रकारानेही तसंच केलं. लाईव्ह न्यूज सुरू असताना ती थांबवून त्याने एका मुक्या जिवाचे प्राण वाचवले. या पत्रकाराचं नाव आहे अॅरन गोन्झालेझ.
पेरू या देशाचा नागरिक असलेला अॅरन तिथल्या एका पूरग्रस्त प्रदेशात जाऊन वार्तांकन करत होता. तो लाईव्ह रिपोर्टिंग करत होता. तो जे काही बोलेल ते त्याच क्षणी हजारो नागरिकांना त्यांच्या टीव्हीवर दिसत होतं. लाईव्ह रिपोर्टिंग करणं हे फार कठीण काम असतं. आपण जी काही बातमी देत असू ती अचूकपणे मांडण्याचं आव्हान त्या पत्रकारासमोर असतं. त्याचवेळी त्याच्या कानामधल्या ईअरफोनमधून न्यूज प्रोड्युसर ज्या सूचना देत असतो ते एेकताना त्यावेळी स्क्रीनवर असणाऱ्या न्यूज अँकरसोबतही त्याला ताळमेळ ठेवावा लागतो.
अॅरनसुध्दा या सगळ्याचा ताळमेळ ठेवत त्याची बातमी सांगत होता तो जिकडे उभा होता त्या ठिकाणी मोठा पूर आला होता. तो बातमी सांग असताना या पुराच्या पाण्यात वाहून जाणारा एक कुत्रा दिसला. यावेळी या वाहत जाणाऱ्या कुत्र्याला दाखवून ‘पहा किती भीषण पूर आहे’ असं तो म्हणू शकला असता. पण त्याने त्यानंतर जे केलं त्यामुळे त्याची सगळीकडे प्रशंसा होते आहे.
अॅरनने त्या पुराच्या पाण्यात स्वत: उतरत त्या कुत्र्याला वाचवलं आणि त्याला हातात घेऊन त्याने आपलं काम सुरू ठेवलं. या सगळ्याचा व्हिडिओ त्याच्या कॅमेरामनने काढून ठेवला आहे. पाहा हा व्हिडिओ