Viral Video of Kalyan Railway Station : मुंबई लोकल म्हणजे मुंबईकरांची जीवनवाहिनी. रोजचे धक्के खात, शिव्या खात या लोकलने प्रवास करत असलो तरीही ती आपली लाईफलाईन आहे. मुंबईच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत कमी खर्चात अन् कमी वेळेत पोहोचवणारं माध्यम म्हणून आपण लोकलकडे पाहतो. पण हा प्रवास आता जीवघेणा ठरू लागलाय. कर भरूनही सर्वसामान्य नागरिकांना मोकळा श्वास घेत साधा प्रवासही करता येत नाही. प्रवास लांबच राहिला, प्रवासासाठी आधी संबंधित लोकल पकडावी लागते, सर्वसामान्य प्रवाशांना ही लोकल पकडण्यापासूनच कसरत करावी लागतेय. कल्याण रेल्वे स्थानकातील हा व्हिडिओ पाहून आपण कर का भरतोय? असाच प्रश्न आपल्यासमोर उभा राहिल.
कल्याण येथे गेल्या काही वर्षांपासून प्रचंड गर्दी वाढली आहे. शहर आणि ग्रामीण भागातील अनेक नागरिक कल्याण येथे स्थायिक झाले. परिणामी कल्याण रेल्वे स्थानकावर त्याचा भार जाणवू लागला. कल्याण येथून लांब पल्ल्याच्या गाड्याही सुटतात. त्यामुळे या स्थानकावर प्रचंड गर्दी असते. मात्र, सकाळच्या प्रहरी या स्थानकावरून लोकल पकडणे आता मुश्लिक होऊ लागले आहे. तसंच, कल्याणच्या पुढच्या सीएसएमटीच्या दिशेने असलेल्या स्थानकावरील अनेक प्रवासी डाऊन मार्गे कल्याण येथे येतात. त्यामुळे कल्याणकरांना येथून ट्रेन पकडणं आता कठीण जातंय. याचाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
बिइंग कल्याणकर या इन्स्टाग्राम पेजने कल्याणकरांचं आयुष्य कसं आहे, यावर एक व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओत लोकलच्या जनरल डब्यात पुरुष प्रवासी आतमध्ये चढण्याचा कसा निरर्थक प्रयत्न करतात हे स्पष्ट दिसंतय. दरवाजावर उभा राहणारा माणूसही अगदी खेटून उभा आहे, त्यामुळे बाहेरील प्रवाशांना आतमध्ये चढण्यास जागा नाही. मुंगी शिरेल इतकीही जागा या डब्यांमध्ये दिसत नाही. तरीही वेळेत ऑफिसला पोहोचण्याकरता पुरुष प्रवासी जनरल डब्यात चढण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्ही सरकारला किती कर भरता? असं कॅप्शन देऊन हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आलाय. त्यामुळे या व्हिडिओखाली तशाच संतप्त प्रतिक्रियाही आल्या आहेत.
नेटकरी म्हणतात कल्याणकरांचं आयुष्य सोपं नाही
काही नेटकरी म्हणत आहेत की, “आपण नुसते कर भरत नाही, इतर वस्तूंवर जीएसटीही भरतो, म्हणजे आपल्या पगारातील ५० टक्के तर कराच्या रुपाने सरकारच्या तिजोरीतच जमा होतात. तरीही सामान्य नागरिकांना योग्य सुविधा पुरवली जात नाही.” दुसरा नेटकरी म्हणतोय की, “कल्याणकरांसाठी आता हे रोजचंच झालं आहे.” तर एका नेटकऱ्याने म्हटलंय की, “कल्याणकरांना कल्याण-भिवंडी-ठाणे अशी मेट्रो हवी आहे. कारण कल्याण येथील बरेचसे प्रवासी ठाण्यातच उतरतात. जर ही मेट्रो सुरू झाली तर लोकलवरील ताण कमी होईल.” तर काहीजण म्हणत आहेत की, “कल्याणकरांचं आयुष्य सोपं नाहीय.”