कन्नड सिनेसृष्टीतील सुपरस्टार अभिनेते पुनीत राजकुमार यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. कन्नड चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक अशी त्यांची ओळख होती. वयाच्या ४६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे कन्नड चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. पुनीत यांना आज (शुक्रवारी २९ ऑक्टोबर) दुपारी १ ते १.३० च्या सुमारास हृदयविकाराचा तीव्र झटका आला. रुग्णालयातील डॉक्टरांचे एक पथक त्याच्यावर सतत नजर ठेवून होते. मात्र त्यानंतर त्यांची प्रकृती खालवत गेली. बंगळुरुमधील विक्रम रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
अभिनेते पुनीत राजकुमार यांच्या निधनाची बातमी समजताच त्यांचे चाहते रडत आहेत. आपल्या भावनांना वाट मोकळी करून देत आहेत. अनेकजण बंगळुरुमधील विक्रम रुग्णालयाच्या बाहेर जमा झाले आहेत.
( हे ही वाचा: हृदयविकाराचा झटका म्हणजे काय? ज्यामुळे झालं कन्नड सुपरस्टार पुनीत राजकुमार यांचे निधन )
त्यांच्या निधनानंतर कन्नड सिनेसृष्टीसह बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हळहळ व्यक्त केली आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकार, दिग्दर्शक, क्रिकेटपटू यांच्यासह अनेकांनी त्यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे.