वडील आणि मुलीमध्ये नेहमी एक सुंदर नातं असतं. ज्या मुलींचं आपल्या वडिलांसोबतच नातं सुंदर असतं. त्यांच्या वयाच्या प्रत्येक टप्प्यातील आठवणी सुंदर असतात. ज्या वडिलांचा हात पकडून आपण चालायला शिकतो त्याच वडिलांचा हात आपल्या डोक्यावर कायम असावा, असं प्रत्येक मुला-मुलींना वाटत असतं. बाप-लेकीच्या नात्याचा हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून लग्नमंडपातील सारेच जण भावूक झाले. लग्नात घरातील वडिलांची उणीव भरून काढण्यासाठी भावाने बहिणीच्या लग्नात हुबेहूब वडिलांसारखा दिसणारा मेणाचा पुतळाच भेट म्हणून दिला. लग्नात दिवंगत वडिलांचा हा जिवंत भासणारा पुतळा पाहून नवरी मात्र भावूक झाली आणि तिच्या डोळ्यातून अश्रू तरंगताना दिसून आले.
प्रत्येक मुलगी आपल्या लग्नात तिच्या आई-वडिलांसाठी भावूक होत असते. लग्नासारख्या नाजूक क्षणी आपले आई-वडील आपल्यासोबत असावेत, अशी प्रत्येक मुलींची इच्छा असते. सध्या जो व्हिडीओ व्हायरल होतोय तो पाहून तुमच्या काळजाचा ठोका चुकेल. हा व्हिडीओ तामिळनाडूमधला असल्याचं सांगण्यात येतंय. तामिळनाडूच्या कल्लाकुरिची जिल्ह्यातील थिरुकोविलूर भागात असलेल्या थानाकानंदल गावात पार पडलेल्या लग्नातला हा व्हिडीओ आहे. इथे राहणारे सुब्रह्मण्यम अवुला यांचं गेल्या मार्च महिन्यातच करोनामुळे निधन झालं होतं. वयाच्या ५६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपासून ते त्यांची मुलगी माहेश्वरी हिच्या लग्नाची तयारी करत होते. जसे प्रत्येक आई-वडील ज्या क्षणांची वाट पाहत होते अगदी त्याचप्रमाणे सुब्रह्मण्यम यांनी सुद्धा त्यांच्या लेकीच्या लग्नाची वाट पाहत होते. पण घरात लग्नाची गडबड सुरू असतानाच काळाने घाला घालता आणि सुब्रह्मण्यम यांनी करोनाने आपल्या जाळ्यात अडकवलं. यात त्यांचा मृत्यू झाला.
आणखी वाचा : VIRAL : ट्विटरवर ट्रेंड करतंय ‘काय झाडी, काय डोंगर, काय हाटील…एकदम ओके..!’; Memes चा पाऊस!
आपले वडील लग्नात आपल्या सोबत नसणार या विचाराने मुलगी माहेश्वरी दुःखी होती. वडीलांची ही कमी पूर्ण करण्यासाठी तिचे भाऊ फाणी अवुला याने कुटुंबीयांच्या मदतीने अनोख सरप्राईज देण्याचा प्रयत्न केला. बहिणीच्या लग्नात भावाने दिवंगत वडीलांचा हुबेहूब दिसणारा मेणाचा पुतळाच लग्न मंडपात आणला. वडिलांचा जिवंत भासवणारा हा पुतळा पाहून नवरी भावूक झाली आणि अक्षरशः गळ्यात पडून रडू लागली. बराच वेळ नवरी या पुतळ्याकडे एकटक पाहत उभी होती. पुतळ्याच्या पायाजवळ बसून बराच वेळ रडत होती. हे दृश्य पाहून लग्नमंडपातील सारेच जण रडू लागले. एकमेकांना धीर देऊ लागले. जणू काही लेकीच्या लग्नासाठी वडील स्वतः तिथे बसलेले आहेत, असा भास हा पुतळा पाहून झाला होता.
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : एका मागोमाग एक बाईक रस्त्यावरून घसरल्या, तो VIRAL VIDEO मुंबईचा नव्हे तर पाकिस्तानचा आहे
रिपोर्ट्सनुसार, फणीने एका मुलाखतीत खुलासा केला की, तो एकेकाळी युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकामध्ये राहत होता. त्याच्या वडिलांचा कोविड-19 मुळे मृत्यू झाला. त्यांची आई आणि त्यांचे दिवंगत वडील निवृत्त होण्यापूर्वी भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) मध्ये काम करत होते. त्यांच्या वडिलांचा मेणाचा पुतळा कर्नाटकात बनवला गेला आणि यासाठी जवळपास एक वर्षाहून अधिक काळ लागला.
हा ह्रदयस्पर्शी व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडलाय की आतापर्यंत या व्हिडीओला ४ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत. तर ४ लाख ३ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. लोक हा व्हिडीओ पाहून वेगवेगळ्या भावूक कमेंट्स शेअर करताना दिसून येत आहेत.