Liquor In Borewell Viral Video: एखाद्या गावातली बोअरवेल म्हणजेच सामान्य भाषेत पाणी हापसून काढायची हापशी. हे ठिकाण सगळ्या प्रकारच्या गप्पा गोष्टी, चर्चा, भांडणं सगळ्यांचं उगमस्थान असतं. इथे तुम्हाला सगळ्या चित्रविचित्र गोष्टी ऐकायला मिळू शकतात पण यावेळेस एका बोअरवेलच्या बाबत विचित्रपणाचा कळसच झाला आहे. बघायला गेलं तर एखाद्या मद्यप्रेमीचं स्वप्नच वाटावं असं हे प्रकरण आहे, तुम्हीच विचार करा उद्या उठून जर एखाद्याला दारू विकत घ्यायची असेल आणि तो पठ्ठ्या दुकानात जाण्याऐवजी गावच्या हापशीवर पोहोचला तर.. तुम्ही म्हणाल काय मस्करी आहे.. पण मंडळी असाच एक प्रकार सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मध्य प्रदेशातील गुना या गावी अलीकडेच एक विचित्र प्रकार समोर आला. या गावातील सार्वजनिक बोअरवेलमधून पाण्याच्या ऐवजी चक्क दारू बाहेर येऊ लागली. या व्हायरल व्हिडिओमध्ये पोलिसही चक्रावून गेलेले दिसत आहे. खरंतर गुना जिल्ह्यात अवैध दारू विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, याच माहितीच्याआधारे पोलिसांनी संभाव्य ठिकाणी छापा मारला मात्र इथे दारूचा कोणताही साठा आढळून आला नाही, इतक्यात त्यांना जवळच्या बोअरवेल मधून दारूचा वास येऊ लागला म्हणूनच पोलीस हापशीजवळ पोहोचले.
बोअरवेल मधून दारू
Video: लिफ्ट बिघडली अन एका सेकंदात धड व डोकं पार… यापुढे पायऱ्याच वापराल
दरम्यान, पोलिसांनी हापशी हापसायला सुरुवात केली तर त्यातून पाण्याच्या जागी पोलिसांना दारू बाहेर येत असल्याचे दिसले. पोलिसांनी बोअरवेलजवळ खोदकाम सुरू केलं. तिथे दारूने भरलेला एक ड्रम लपवलेला होता ज्यात अवैध पद्धतीने दारू साठवण्यात आली होती. बोअरवेलच्या सहाय्याने आरोपी जमिनीत गाडलेल्या ड्रममधून दारू काढायचे व मग विक्री करायचे. या दारू विक्रीतील आरोपी सध्या फरार आहेत.