Mamata Banerjee Viral Video: सोशल मीडियाचा सर्वसामान्यांप्रमाणे राजकीय नेत्यांच्या जीवनामध्येही प्रभाव पडल्याचे पाहायला मिळते. गेल्या काही वर्षांमध्ये राजकारणी मंडळींचे असंख्य व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये ते भाषण करताना, जनतेशी संवाद साधताना किंवा प्रचार करताना दिसतात. कधी-कधी राजकारण्यांच्या खासगी आयुष्यातील व्हिडीओ देखील सोशल मीडियावर पाहायला मिळतात. या माध्यमाच्या वापरामध्ये वाढ होत असल्याने नेतेमंडळींही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह राहायला लागले आहेत. सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्यांमध्ये अनेक दिग्गज राजकीय नेत्यांचा समावेश आहे.
पश्चिम बंगाल राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सोशल मीडियावर फार सक्रीय असल्याचे पाहायला मिळते. त्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले जातात. त्या स्वत: देखील फेसबुक, इंन्स्टाग्राम अशा साइट्सवर व्हिडीओ, फोटो पोस्ट करत असतात. त्यांनी इन्स्टाग्रामवर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ममता बॅनर्जी ट्रेडमिलवर चालत व्यायाम करताना दिसत आहेत. व्यायाम करत असताना त्यांनी हातामध्ये एक छोटं कुत्र्याचं पिल्लू धरलं आहे. हा त्यांचा पाळलेला कुत्रा आहे असे काही यूजर्स म्हणत आहेत.
ममता बॅनर्जी यांच्या या व्हिडीओखाली ‘कधीतरी तुम्हाला एक्स्ट्रा मोटिव्हेशनची गरज लागते’ असे कॅप्शन लिहिलेले आहे. या कॅप्शनमध्ये कुत्र्याच्या इमोजीचा वापरदेखील करण्यात आला आहे. काही तासांपूर्वी पोस्ट करण्यात आलेल्या हा व्हिडीओ हजारो इन्स्टाग्राम यूजर्सनी पाहिला आहे. याला २९ हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. शिवाय लोकांनी व्हिडीओच्या खाली असंख्य कमेंट्स देखील केल्या आहेत. या व्हिडीओमुळे ममता बॅनर्जींच्या व्यक्तिमत्त्वाचा हळवा कोपरा समोर आला असल्याचे लोक म्हणत आहे.
ममता बॅनर्जी या तृणमूल कॉंग्रेस पक्षाच्या प्रमुख आहेत. कॉंग्रेस पक्षातून बाहेर पडून त्यांनी स्वत:चा नवा पक्ष स्थापन केला होता. २०११ पासून त्या पश्चिम बंगाल राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान आहेत. ममता बॅनर्जी भारतीय राजकारणातील महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहेत.