लहान-थोरांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळेच सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकले आहेत. सोशल मीडियावर लाईक्स व कमेंट मिळविण्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ शेअर करताना दिसून येतात. आता तर वाढदिवसानिमित्त हातात तलवार घेऊन केक कापताना किंवा हातात शस्त्र घेऊन व्हिडिओ टाकण्याचे फॅड वाढत आहे.मित्रमंडळीत एखाद्याचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. अनेकजण केक कापताना चाकूऐवजी तलवारीचा वापर करतात, हातात पिस्तूल घेतात. मात्र,असे प्रकार अंगलट येत असून अनेकांना जेलची हवा खावी लागत आहे. असाच एक प्रकार दिल्लीमध्ये घडला आहे. एक व्यक्ती वाढदिवसाचा केक चक्क पिस्तूलानं कापताना दिसत आहे. हा व्हडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
चक्क पिस्तूलानं कापला केक –
हा व्हायरल होणारा व्हिडीओ दिल्ली पोलिसांनी स्वत:च्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक व्यक्ती त्याचा वाढदिवस साजरा करताना दिसत आहे. काही जण फटाके फोडत आहेत. सगळ्या मित्रांचं जोरदार सेलिब्रेशन सुरु आहे, दरम्यान जेव्हा केक कापायची वेळ येते तेव्हा तो व्यक्ती चक्क पिस्तूलानं केक कापतो. मात्र या व्यक्तीची ही हिरोगीरी फार काळ टिकली नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लगेचच दिल्ली पोलिसांनी याची दखल घेतली आणि त्या व्यक्तिला ताब्यात घेण्यात आलं.
पाहा व्हिडीओ –
हेही वाचा – video viral: रिल्सचा मोह बेतला तरुणाच्या जीवावर; गंगा नदीत शेवटी…
दरम्यान त्या व्यक्तिकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि २ जिवंत काडतूसे जप्त करत त्याच्यावर कलम २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी शेअर केलेल्या व्हिडीओला 35.6 हजार पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले असून समाजात जागरुकता निर्माण करण्यासाठी सुरक्षा दलाच्या कार्यपद्धतीचे नेटकऱ्यांनी स्वागत केले आहे. तसेच केवळ लाईक्स व कमेंट्सच्या उत्सुकतेपोटी असे धोकादायक व्हिडिओ करणे टाळावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे.