भारतात रेल्वेचे विस्तृत जाळे पसरले आहे तरीही प्रवाशांसाठी ही सेवा अपुरीच पडत आहे. आजही अनेक प्रवासी जीव मुठीत घेऊन रेल्वेने धोकादायकरित्या प्रवास करताना दिसतात. कधी खचाखच गर्दीने भरलेल्या डब्यांमध्ये घुसतात, तर कधी दरवाज्यामध्ये लटकून प्रवास करतात. काही लोकांना तर जीवाची अजिबात पर्वा नसते त्यामुळे रेल्वेच्या छतावर, तर रेल्वेच्या डब्यांच्यामध्ये उभे राहून प्रवास करताना दिसतात. दरम्यान अशाच धोकादायक पद्धतीने प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाचा व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना धक्का बसला आहे कारण अशा पद्धतीने कोणी प्रवास करू शकते यावर त्यांना विश्वास बसत नाही. व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे,
जबलपूर रेल्वे स्थानकावरून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात एक तरुण ट्रेनखाली चाकांच्यामधोमध बसून धोकादायकरित्या प्रवास करत आहे. पुणे-दानापूर एक्स्प्रेसच्या चाकांच्यामध्ये नियमित अंडर कॅरेजच्यातपासणीदरम्यान हा माणूस आढळून आला.
रेल्वे कर्मचारी आणि पाहुण्यांनी त्याला त्या ठिकाणाहून काढण्यासाठी वेळीच धाव घेतली.
चौकशी केली असता, त्या व्यक्तीने उघड केले की त्याने इटारसी ते जबलपूर असा सुमारे २५० किलोमीटरचा धोकादायकरित्या अंतर कापले होते. काही वेळातच कॅरेज आणि वॅगन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्या व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात दिले.
या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पश्चिम मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून, त्याच्या बेपर्वा वर्तनाबद्दल संबंधित व्यक्तीवर योग्य ती कारवाई केली जाईल.
© IE Online Media Services (P) Ltd