देशात कोरोनाची परिस्थिती अतिशय बिकट असून लोकांनी विषाणू संसर्गाची ही साखळी तोडण्यासाठी कोरोनासाठीचे सर्व नियम पाळणे गरजेचे आहे. करोनाच्या दोन जीवघेण्या लाटांना हाहाकार पाहून आता तिसरी लाट आपलं डोकं वर काढत असताना सुद्धा लोकांना याचं गांभिर्य कळलेलं नाही. याचाच प्रत्यय देणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. करोना प्रोटोकॉलची धुळधाण उडवत लोकांनी गोव्याच्या बीचवर तुफान गर्दी केल्याचं समोर आलं आहे. नववर्षाच्या प्रारंभाला गोव्याच्या बीचवर उसळलेल्या बेसुमार गर्दीने नागरिकांता निष्काळजीपणा पुन्हा समोर आलाय.
डिसेंबर महिन्याच्या अखेरीपासून गोव्यात पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. ख्रिसमस आणि नवीन वर्ष साजरे करण्यासाठी इतर राज्यातून मोठ्या संख्येने लोक इथे येतात. हा व्हिडीओ @Herman_Gomes नावाच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘करोना लाटेत पर्यटकांचं शाही स्वागत आहे.’ अशी कॅप्शन देत त्यांनी हा व्हिडीओ शेअर केलाय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. २०२१ वर्षाला निरोप दिल्यानंतर लोकांनी गोव्याच्या बीचवर नववर्षाचं स्वागत केलंय. मात्र, नववर्षाचं स्वागत करण्याच्या आनंदात लोकांनी करोना नियम पायदळी तुडवले आहेत. प्रत्येक दिवशी वाढणारे करोना रूग्णांचे आकडे पाहता करोनाची तिसरी लाट दाद ठोठावणार असल्याचं चित्र असूनही लोकांना मात्र याचा विसर पडला आणि गोव्याच्या बीचवर सर्वकाही विसरून बेसुमार गर्दी केली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ उत्तर गोव्यातील बागा बीचवरचा आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, कशा पद्धतीने हजारो लोक रस्त्यावरून चालताना दिसत आहेत. रस्त्याच्या मधोमध गाड्यांच्या लांबच लांब रांगा आणि रस्त्याच्या दोन्ही बाजुस लोकांनी खचाखच भरलेली गर्दी, हे चित्र पाहून करोनाच्या तिसऱ्या लाटेचा हाहाकार डोळ्यासमोर उभा राहतो. या ठिकाणी लोकांनी इतकी गर्दी केली आहे की अक्षरशः पाय ठेवायला ही जागा उरली नसेल.
आणखी वाचा : जेव्हा कुत्र्याने रस्त्यावरच्या बेघर माणसाला घट्ट मिठी मारली… हा VIRAL VIDEO पाहून तुम्ही सुद्धा व्हाल भावूक
शासन प्रशासन वेळोवेळी नागरिकांना करोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत सजग करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, या प्रयत्नांना नागरिकांकडूनच दाद मिळत नसल्याचं चित्र या व्हिडीओमधून दिसत आहे. नागरिकांच्या या असावध भूमिकेमुळे नववर्षाच्या प्रारंभी अशुभ अशा संक्रमणाचा प्रसार होण्याची भीती वर्तवण्यात येतेय.
आणखी वाचा : वरातीत नवरदेवाला पाहिलं आणि खिडकीतच उभी राहून नवरी त्याच्यासोबत नाचू लागली ; VIRAL VIDEO एकदा पाहाच
आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, गोव्यात रविवारी कोविड-१९ चे ३८८ नवीन रुग्ण नोंदवले गेले. इथे संसर्गाचा दर १० टक्क्यांच्या पुढे गेला आहे. ख्रिसमस सण ते नववर्ष या कालावधीत गोव्यात आलेल्या मोठ्या संख्येने पर्यटक हे राज्यातील करोना विषाणूच्या संसर्गाचे प्रमाण १० टक्क्यांच्या पुढे जाण्यास कारणीभूत असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.
करोनाचे नवीन रुग्ण आढळल्याने राज्यातील एकूण बाधितांची संख्या १ लाख ८१ हजार ५७० झाली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण ३५२३ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.