Mahakumbh Mela 2025 Viral Video : महाकुंभेमेळ्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने गर्दी वाढते आहे. पवित्र गंगा नदीत स्नान करण्यासाठी देशभरातली भाविक प्रयागराज येथे दाखल होत आहेत.सरकारी आकडेवारीनुसार आतापर्यंत ४८.८३ कोटी लोकांनी पवित्रस्नान केले आहे. दरम्यान मोठ्या प्रमाणात येथे भाविक जमा होत असल्याने त्यांच्या विविध गरजांसाठी येथे विविध सुविधाही पुरवल्या जात आहेत. तर, अनेक लहान-मोठ्या व्यावसायिकांनीही येथे आपलं बस्तान मांडलं असून विविध सेवा दिल्या जात आहेत.
सोशल मीडियावरील अनेक व्हिडिओ आता समोर येऊ लागले आहेत. यानुसार, तिथे टुथब्रशपासून जेवणापर्यंत सर्वकाही पदार्थांची विक्री करणारे लहान लहान स्टॉल्स लागल्याचं या व्हिडिओतून स्पष्ट होतंय. पण या सर्वांत एका व्यक्तीने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. तो म्हणजे मोबाईल चार्ज करून देणारा लहान व्यवसायिक.
मेहनतीने पैसा कमावणारा माणूस कुठेही पैसा कमावू शकतो. त्याच्याकडे फक्त तशी संकल्पना हवी. त्यामुळे देशभरातली अनेकांनी प्रयागराज येथे लहान मोठे स्टॉल टाकले आहेत. यातून ते दिवसाला हजारो रुपये कमावत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओमुळे एक असाच छोटा व्यवसायिक प्रसिद्धिस आला आहे. तो भाविकांचे मोबाईल चार्ज करून देतो.
एका तासाला हजारो रुपये कमवतात
@Malaram_yadav_alampur01 या अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर झाला असून या व्हिडिओतील एक व्यक्ती महाकुंभला आलेल्या लोकांचे मोबाईल फोन चार्ज करून देत आहे. एका तासाचे तो ५० रुपये आकारत असून एकावेळेला जवळपास २५ मोबाईल फोन चार्ज केले जात आहेत. त्यानुसार, तो एका तासाला जवळपास हजार रुपये कमवत असल्याचा त्याचा दावा आहे. या व्हिडिओलाच अदाणी आणि अंबानीही यांच्यासमोर अपयशी ठरतील, अशी भन्नाट कॅप्शनही देण्यात आली आहे.
प्रत्येक १०० मीटर अंतरावर मोफत मोबाईल चार्जिंग स्टेशन
दरम्यान, याच व्हिडिओवर काही कमेंट्स आल्या आहेत. या कमेंट्सनुसार मोबाईल फोन चार्ज करण्याकरता पैसे आकारले जात नसून ही सुविधा मोफत असल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. तसंच, प्रत्येक १०० मीटर अंतरावर मोबाईल चार्जिंग स्टेशन उभारण्यात आल्याची माहितीही काही नेटकऱ्यांनी या कमेंट्मार्फ दिली.