लहानपणी ती माकड आणि टोपीवाल्याची गोष्ट ऐकलेली आठवतेय का? अगदी तेव्हापासूनच माकड आणि माणूस यांच्यातील पकडापकडीचा खेळ एकदमच गाजलेला विषय आहे. आजही कुठे नव्या ठिकाणी फिरायला जायचं तर माकडांपासून अधिक सांभाळून राहावं लागतं आणि जर काळजी घेतली नाही तर फक्त तुमच्या खाण्यापिण्याच्या नव्हे तर अगदी कुठल्याही गोष्टीला उचलून कळणारही नाही अशा वेगात ही माकडं पळ काढतात. असाच एक अनुभव आता मथुरा येथील जिल्हा न्यायाधीश नवनीत सिंह चहल यांना सुद्धा आला आहे. माकडाने चहल यांचा चष्मा घेऊन पळ काढला आणि पुढे जे घडलं ते पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
जिल्हा न्यायाधीश नवनीत सिंह चहल व एसएसपी अभिषेक यादव बांके बिहारी मंदिर आणि आसपासच्या परिसराची पाहणी करत असताना, अचानक माकडाने डीएमच्या डोळ्यांवरील चष्मा पळवून नेल्याची घटना घडली आहे. सुरक्षा कर्मचार्यांचा ताफा सोबत असतानाही कोणाला चाहूलही लागणार नाही या वेगाने माकड चष्मा घेऊन निघूनही गेले होते.
मग काय माकड पुढे पुढे आणि त्याला पकडायला न्यायाधीशांची माणसं मागे मागे हा खेळ बराच वेळ सुरु राहिला. अगदी रडकुंडीला आणेपर्यंत या माकडाने सर्वांना खूप दमवलं. शेवटी अथक प्रयत्नांनंतर जेव्हा स्थानिकांनी माकडाला फ्रूटीचे आमिष दाखवले तेव्हा कुठे माकड जवळ आले. त्यानंतर जेव्हा शिपाई माकडाच्या मागे धावले तेव्हा माकड चष्मा सोडून पळून गेले. सध्या या घटनेचा जोरदार व्हिडीओ व्हायरल होत आहे.
पहा माकडाचा प्रताप
Video: घर पाडण्याऐवजी चक्क हलवलं; पंजाबमधील शेतकऱ्याचा ‘देसी जुगाड’ ठरला चर्चेचा विषय
दरम्यान, हा जरी खेळ वाटत असला तरी, या व्हिडीओवर आलेल्या काही कमेंट्स खरंच विचारात घेण्यासारख्या आहेत. एका ट्विटर युजरने ही माकडं स्थानिक चोरांच्या टोळ्यांची असून त्यांनी इतरांच्या वस्तू चोरून आणण्यासाठी या मुक्या जीवांना शिकवण दिलेली असते असा दावा केला आहे. याप्रकरणी तपास होणार का आणि खरोखरचं यात चोरांचा हात असल्यास त्यांच्यावर कशी कारवाई करणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.