सुरक्षादलामधील जवानांचे शौर्य पाहिल्यावर अनेकांचा ऊर अभिमानाने भरुन येतो. कोणतीही नैसर्गिक आपत्ती असो किंवा देशांचे सौंरक्षण असो सर्वच ठिकाणी भारतीय लष्कर आणि सुरक्षा दलांमधील जवान आघाडीवर असतात. त्यांच्या शौर्याचे आणि पराक्रमाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ वेळोवेळी व्हायरल होताना दिसतात. मात्र सध्या इंटरनेटवर चर्चा आहे नागा महिला बटालियनची. या महिला बटालियनने चक्क एक चारचाकी गाडी उचलल्याचा व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीची बोलेरो ही चारचाकी गाडी रस्त्याच्याकडेला असणाऱ्या खड्ड्यामध्ये अडकल्याचे दिसते. ही गाडी सुरक्षादलांच्या ताफ्यामधील असून एका जंगली भागातून जाणाऱ्या रस्त्याच्याकडेला ती अडकल्याचे दिसत आहे. ही गाडी आधी रेस करुन बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातो मात्र तो यशस्वी होत नाही. अखेर नागा महिला बटालियनच्या पाच ते सहा महिला जवान या गाडीचा पुढचा अडकलेला भाग उचलण्यासाठी पुढे सरसावतात. एका दमात त्या गाडीचा खड्ड्यामध्ये अडकलेला भाग उचलतात गाडी रेस करुन ती मागे घेऊन पुन्हा रस्त्यावर येते. त्यानंतर या महिला जवान आनंद साजरा करताना या व्हिडिओत दिसत आहेत.

हा व्हिडिओ पाहून महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्राही प्रभावित झाले आहेत. त्यांनाही हा व्हिडिओ कोट करुन रिट्विट केला आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, ‘ही बोलेरो गाडी तिथे कशी गेली मला ठाऊक नाही. मात्र ही गाडी बाहेर काढण्यासाठी काही सक्षम महिला सैनिक तेथे होत्या याचा आनंद आहे,’ असं मत व्यक्त केलं आहे. तसेच या ट्विटच्या शेवटच्या ओळीत त्यांनी मजेदारपद्धतीने या महिलांचे कौतुक केले आहे. ‘हा व्हिडिओ पाहिल्यावर मी नागा महिला बटालियनसमोर उभाही राहणार नाही,’ असं महिंद्रा म्हणाले आहेत.

दरम्यान, सोशल नेटवर्किंगवर या व्हिडिओची चर्चा असली तरी नक्की ही घटना कधी आणि कुठे घडली याबद्दलची माहिती समोर आलेली नाही.

Story img Loader