Viral Video: प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील त्याच्या आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही. माणूस वयाने कितीही लहान असला किंवा मोठा असला तरी त्याला नेहमीच त्याच्या आईच्या सहवासाची आणि प्रेमाची ओढ असते. आई-वडिलांकडून मिळालेले प्रेम, शिकवण लहानपणापासूनच मुलांच्या आयुष्यावर प्रभाव टाकते. अनेकदा हे सुख प्रत्येकाच्या वाट्याला दीर्घकाळासाठी येत नाही; पण आईच्या सहवासात मिळालेली शिकवण मात्र दीर्घकाळ स्मरणात राहते. सध्या व्हायरल होत असलेल्या या चिमुकल्याच्या व्हिडीओतही असंच काहीसं पाहायला मिळत आहे.

आपल्या सतत जवळ असलेली एखादी वस्तू आपल्या समोर असली की त्याची किंमत आपल्याला कधीच नसते. पण, तीच वस्तू हरवली की आपले डोळे ती गोष्टी शोधण्याचा प्रयत्न करतात, ती मिळावी यासाठी अतोनात प्रयत्न करतात. कुटुंबातील नात्यांचंही तसंच आहे. आई आपल्या जवळ असते तेव्हा अनेक जण तिच्या प्रेमाची कदर करत नाहीत. पण, ती जेव्हा आपल्यापासून दूर निघून जाते, तेव्हा तिचा प्रत्येक शब्द आपल्या कानात ऐकू येऊ लागतो. सध्या व्हायरल होत असलेल्या चिमुकल्याची आईदेखील त्याला अशीच सोडून गेली, ज्यावर तो भावूक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, “चिमुकला आईच्या अपघाती मृत्यूने भावूक झाला असून तो एका वृत्तवाहिनीच्या पत्रकारांना आईबद्दल बोलताना दिसत आहे. यावेळी तो म्हणतो की, मी डॉक्टर बनून आईला खूश करणार होतो, पण माझी आई गेली. आई म्हणायची, कधीही चांगलं वागावं, तुला चांगलं वळण लागावं, कधी कोणाशी भांडू नये. २ वजासाठी १५० रुपये कमावयाला जात व्हती,” असं म्हणत तो भावूक झाला.

हा व्हिडीओ नांदेडमधील असून या चिमुकल्याची आई ट्रॅक्टरमधून मजुरी करण्यासाठी जात असताना ट्रॅक्टर विहिरीत पडला, यावेळी आठ महिला मजुरांचा जागीच मृत्यू झाला.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टग्रावरील @vishal_global_gyan या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून याला आतापर्यंत तीन लाखांहून अधिक व्ह्युज आणि लाखो लाइक्स मिळाल्या आहेत. अनेक युजर्सही या व्हिडीओवर कमेंट्स करताना दिसत आहेत.

एकाने लिहिलंय की, “शब्द ऐकून निःशब्द झालोय बाळा”, तर दुसऱ्याने लिहिलंय की, “देवा किती परीक्षा घेणार या बाळाची, निदान पैसा नाही दिला, माय कशाला हिरावून नेली”; तर तिसऱ्या युजरने लिहिलंय की, “खूप वाईट वाटतंय यार, पण काय नियतीचे फासे अक्षरशः डोळ्यात पाणी आलं”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “बाळा मोठा होशील… पैसेवाला होशील… आशीर्वाद आणि शुभेच्छा आहेत तुला. खूप समजूतदार आहेस.”