Viral Video: परिस्थिती प्रत्येकासाठी सारखी नसते, कोणी श्रीमंत असते, ऐष आरामाचे आयुष्य जगतात, हवी ती हौस पूर्ण करतात पण काही लोक गरीब असतात ज्यांना दोन वेळचे जेवण देखील मोठ्या कष्टाने मिळते. हौस म्हणजे काय हे त्यांना माहित नसते. प्रत्येक जण आपल्या परिस्थितीनुसार खर्च करतो. कोणी आपल्या रोजच्या गरजा भागवतो तर कोणी सर्व सुखसोयींचा आनंद घेतो. अशा परिस्थितीमध्ये फार कमी लोक एकमेकांच्या मदतीला धावून येतात. वाईट परिस्थितीमध्ये साथ देतात तेच खरे मित्र असतात. मोठ्या माणसांना जे कळतं नाही ते लहान मुलांना मात्र खूप चांगले समजते. खरी मैत्री काय असते याची झलक दाखवणारा चिमुकल्यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकरी देखील भावूक झाले आहेत.
व्हिडीओच्या सुरुवातीला दिसते की, काही मुले वर्गात काहीतरी करत आहे. शिक्षिका जेव्हा त्यांना आवाज देऊन विचारते तेव्हा मुले शिक्षिकेकडे येतात आणि त्यांचा वर्गमित्र प्रिन्ससाठी जमा केलेले पैसे देतात आणि सांगतात की त्याच्या पिकनिकचे पैसे आहेत. शिक्षिका त्यांना सांगते की, प्रिन्सचे पैसे मी भरणार आहे त्यावर सर्वजण नकार देतात आणि त्यांनी दिलेले पैसे प्रिन्सच्या हातात देतात. जे पाहून प्रिन्स भावूक होतो. सर्व मित्र त्याला आलिंगन देऊन सांत्वन करतात.
नेपाळमधील स्मॉल हेवन स्कूलमधील एका गोड आणि जबरदस्त व्हिडिओने लाखो सोशल मीडिया वापरकर्त्यांची मने जिंकली आहेत. अलिकडेच व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये काही शाळकरी विद्यार्थी त्यांच्या वर्गमित्राला शाळेतील पिकनिकला जाता यावे म्हणून पैसे जमा करून शिक्षिककडे जमा करतात. हा हृदयस्पर्शी व्हिडिओ त्यांच्या वर्गशिक्षिकेने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे, या कॅप्शनसह, “आज सर्वात हृदयस्पर्शी गोष्ट पाहून मला खूप आनंद झाला. या चिमुकल्यांच्या चांगुलपणांने मला आठवण करून दिली की,” एकमेकांना मदत करणे ही माणूस म्हणून करू शकतो अशा गोष्टींपैकी सर्वोत्तम गोष्ट आहे. मला आशा आहे की,”हे लहान देवदूत त्यांचा निरागसपणा आणि निष्पाप वृत्ती कायम ठेवतील आणि जगाला त्याचा फायदा होईल.”
व्हायरल व्हिडिओ येथे पहा:
‘Me Sangye’ नावाच्या आयजी अकाउंटच्या शिक्षिकेने प्रिन्स त्याच्या मित्रांबरोबर पिकनिकमध्ये एन्जॉय करतानाचा आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे. आणखी एका व्हिडिओमध्ये, तिने नेटिझन्सना मागील व्हायरल व्हिडिओवरील गोड कमेंट्स आणि प्रतिक्रियेबद्दल आभार मानले आणि सांगितले की, “प्रिन्स त्यांच्या दयाळूपणाने खरोखरच भारावून गेला होता, म्हणून त्याने कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून सर्वांना आईस्क्रीम दिले आहे. त्याच्या आईने त्याच्या वर्गमित्रांसाठी उसाने भरलेली बॅग पाठवली आहे ज्यामुळे क्षणाची गोडवा वाढली आहे!”
ती पुढे म्हणाली, “प्रिन्सचे पालक आमच्या शाळेजवळ एक ज्यूस स्टॉल चालवतात, जो हिवाळ्यासाठी तात्पुरता बंद आहे पण एका आठवड्यात पुन्हा सुरू होईल. मी त्यांना लवकरच भेट देण्याचे आश्वासन दिले आहे आणि मी त्यांना पाठिंबा देण्यासाठी उत्सुक आहे! आणि ज्या लोकांना आश्चर्य वाटत आहे त्यांच्यासाठी, अभ्यासात कोणताही अडथळा आला नाही, तास संपल्यानंतर तो क्षण टिपण्यात आला.”
नेटिझन्सच्या प्रतिक्रिया
या सुंदर व्हिडीओला आतापर्यंत दहा लाखांहून अधिक व्ह्यूज आणि दीड लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत, अनेक वापरकर्त्यांनी विद्यार्थ्यांच्या दयाळूपणाचे , शिक्षकांच्या आणि शाळेच्या शिकवणीचे कौतुक केले आहे.
व्हिडीओवर कमेंट करत एकाने लिहिले की, मित्र असावे तर असे!
दुसऱ्याने कमेंट केली की,”प्रिन्स हा मी पाहिलेला सर्वात श्रीमंत माणूस आहे. . प्रणव सारख्या मित्रांचे कौतुक!”
तिसऱ्याने कमेंट केली की, “ते सर्व मोठे झाल्यावर, हा व्हिडिओ त्यांच्या अमूल्य आठवणींनी भरून जाईल. रेकॉर्डिंग शिक्षक, खूप छान काम”
एकाने आपल्या बालपणाचे अनुभव सांगत म्हटले की,”मला माझं बालपण आठवतंय. एकदा माझ्या पालकांनी मला पिकनिकला जाऊ दिले नाही आणि माझ्या शाळेतील मित्रांनी माझ्यासाठी पैसे गोळा केले. मी तुम्हा सर्वांवर प्रेम करतो. माझ्यासाठी तुमचे विशेष स्थान आहे.”