सोशल मीडियावरती रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. मात्र, सध्या एका टेस्ला कारच्या अपघाताचा व्हिडीओ व्हायरल होत असलेला व्हिडीओ एवढा भयंकर आहे की, तो पाहताना तुमच्या अंगावर देखील काटा येईल. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती त्याच्या मालकीची टेस्ला कार पार्क करत असताना अचानक ही कार अचानक भरधाव वेगाने धावताना दिसतं आहे.
चालकाचा ताबा सुटल्यामुळे या भरधाव कारने अनेक गाड्यांना धडक दिली आहे. तर या अपघातामध्ये एका निष्पाप शाळकरी मुलीसह दोन जणांचा मृत्यू झाला आहे. हा व्हिडीओ बघताना अक्षरश: अंगावरती काटा येत आहे. कारण, ही कार ज्या वेगाने रस्त्यांवरती धावत आहे ती दृश्य अतिशय भयानक आहे.
कार पार्क करत असताना कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटताच ती कार भरधाव वेगाने जातानाची दृश्य शहरातील अनेक सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतं आहेत. शिवाय ही कार रस्त्यात येणाऱ्या अनेक जणांना चिरडून टाकत आहे. पहिल्या दोन सीसीटीव्ही फुटेजनंतर एका ठिकाणी ही कार रस्त्याच्या बाजूने सायकल चालवत असणाऱ्या एका व्यक्तीला धडक देत आहे. तर काही वेळाने एका तीनचाकी रिक्षाला ही कार एवढ्या जोराची धडक देतेय की त्या रिक्षाचा चक्काचूर झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना चीनच्या दक्षिणेकडील चाओझोउ शहरात ५ नोव्हेंबर रोजी घडली आहे. चीनमधील काही स्थानिक वृत्तसंस्थाना कार चालकाच्या कुटुंबीयांनी सांगितलं की, कारच्या ब्रेकमध्ये काही समस्या निर्माण झाल्याने हा अपघात झाला. तर पोलिसांनी मात्र हा अपघात नेमका कशामुळे झाला याचं कारण स्पष्ट केलें नाही.
आणखी वाचा- CNG भरताना कारमधून का उतरतात? जाणून घ्या त्यामागचं महत्वाचं कारण
दरम्यान, टेस्ला कारच्या या भयंकर अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. शिवाय या अपघातामागे कारचा ब्रेक फेल झाल्याचा दावा देखील अनेकजण करत होते. त्यामुळे व्हायरल होत असलेल्या या घटनेची दखल तत्काळ टेस्ला कंपनीने घेत या कार अपघातावर भाष्य केलं.
कंपनीकडून सांगण्यात आलं की, “हा अपघात नेमका कशामुळे झाला, त्यामागचं खरं कारण आम्ही शोधत आहोत. मात्र, तो पर्यंत नागरिकांनी अफवांवरती विश्वास ठेवू नये” असं आवाहन कंपनीकडून करण्यात आलं आहे. चीनमध्ये टेस्ला कंपनीच्या कारचा ब्रेक फेल झाल्यामुळे अपघात झाल्याची ही पहिलीच वेळ नसल्याचंही सांगितलं जात आहे. टेस्ला कंपनीसाठी चीन ही जगातील दुसरी सर्वात मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे कंपनीकडून आता या अपघातावर काय स्पष्टीकरण देण्यात येतयं हे पाहणं देखील महत्वाचं आहे.