कोळी म्हटलं की अनेकांच्या अंगावर काटा उभा राहतो. या कोळीचे असंख्य पाय आणि त्याचं आगळंवेगळ रूप पाहून अनेकांच्या अंगाचा थरकाप उडतो. मात्र, हाच कोळी तुमच्या तोंडातून निघाला तर? विश्वास बसत नाही ना? पण हो, असं झालंय आणि हा काही चित्रपटाचा सीन नाही, तर एका व्यक्तीने स्वतः आपल्या तोंडातून हा कोळी निघतानाचा व्हिडीओ इंस्टाग्रामवर पोस्ट केलाय.
ऑक्टोबर महिना संपता संपता आता पाश्चिमात्य देशांमध्ये वेगळंच वारं वाहतंय. हे वारं आहे हॅलोवीनचं (Halloween). ३१ ऑक्टोबरला साजरा होणाऱ्या या दिवशी अनेकजण अंगावर काटा उभा करणारे फोटो, व्हिडीओ पोस्ट करत असतात. याचाच भाग म्हणून प्राणी संग्रहालयात काम करणाऱ्या जय ब्रेवर (Zookeeper Jay Brewer) या व्यक्तीने त्याच्या तोंडातून भलामोठा कोळी निघत असल्याचा व्हिडीओ इंस्टाग्रामवर पोस्ट केलाय. हॅलोविनला धडकी भरवणाऱ्या अनेक कारनाम्यांची सुरुवात आणि हेलोविनच्या स्वागतासाठी ब्रेवर यांनी हा व्हिडीओ पोस्ट केलाय.
या व्हिडीओला इंस्टाग्रामवर चांगलीच पसंती मिळत आहे. अनेकजण हा व्हिडीओ पाहून आश्चर्यचकित झालेत. व्हिडीओवर प्रतिक्रियांचा पाऊस पडतोय. आम्ही कोळी खाल्लाय, पण असा तोंडात धरण्याची हिंमत झाली नाही, अशीही प्रतिक्रिया एका युजरने व्यक्त केलीय.
हॅलोवीन काय आहे?
हॅलोवीन हा पाश्चात्य देशांमध्ये लोकप्रिय असणारा सण. हा सण ३१ ऑक्टोबरला साजरा करण्यात येतो. या देशांमध्ये ३ दिवस हॅलोटाईड उत्सव साजरा होतो. यात मृत व्यक्ती, संत (हॉलो), शहीद अशा लोकांच्या आठवणी जागवल्या जातात.