Viral Video: जंगलातील प्राणी मानवी वस्तीत येणं आता सामान्य झालं आहे. वाढते शहरीकरण, मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड, जंगलातील नागरिकांचा वाढता वावर आदी प्रमुख कारणांसह जंगलातील अपुरे पाण्याचे स्रोत, जंगलातील धोक्यात आलेला प्राण्यांचा निवारा आदी अनेक कारणांमुळे जंगलातील प्राणी मानवी वस्तीत दिसण्याच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. पण, शहरी वस्तीत या प्राण्यांचा शिरकाव माणसांसाठी धोकादायक ठरतो आहे. आज सोशल मीडियावर याचसंबंधित एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत आहे. या व्हिडीओत काही माकडांनी एका चिमुकल्यावर हल्ला केला आहे.
व्हायरल व्हिडीओ मथुराचा आहे.काही माकडं रहदारीच्या परिसरात दिसत आहेत. या माकडांच्या रहदारीत अचानक एक पाच वर्षांचा छोटा मुलगा त्याच्या घरातून बाहेर येतो. हे पाहून दोन माकडांनी त्याच्यावर हल्ला केला. चिमुकला धावण्याचा प्रयत्न करू लागला. तितक्यात दोन्ही माकडांनी चिमुकल्याला खाली पाडलं आणि धरून ठेवले होते. तिथे काही अज्ञात महिला हे दृश्य दुरून पाहत होत्या. पण, चिमुकल्याला वाचवण्यासाठी त्या पुढे आल्या नाहीत. चिमुकल्याची माकडांपासून सुटका झाली का हे व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा.
व्हिडीओ नक्की बघा…
अनेकदा प्राण्यांनी हल्ला केल्यावर कोणीही इतरांना वाचवण्यासाठी पुढाकार घेत नाही. व्हायरल व्हिडीओतसुद्धा तसंच पाहायला मिळालं आहे. चिमुकल्यावर दोन माकडं हल्ला करतात. काही अज्ञात महिला हे पाहूनसुद्धा पुढे येत नाहीत किंवा इतरांनाही मदत करायला सांगत नाहीत. तर काही पुरुष मंडळी हे पाहून धावत त्या दिशेने येतात. पण, कोणाच्याही मदती आधी चिमुकल्याने काही सेकंदात स्वतःची सुटका करून घेतली. नंतर आरडाओरडा झाल्यावर परिसरातील आणखीन काही माणसं तेथे जमली व हल्ला करणारी माकडं घराच्या पत्र्यावर चढून वर निघून गेली.
माकडांनी पळ काढल्यावर चिमुकल्याला लागलं आहे का याची तपासणी एक अज्ञात माणूस करू लागला. सोशल मीडियावर हा व्हिडीओ @IndianTechGuide या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे ; जो सीसीटीव्ही कॅमेरामध्ये रेकॉर्ड झाला आहे. चिमुकल्याच्या मदतीला कोणीही आलं नाही हे पाहून नेटकरी संताप व्यक्त करताना दिसत आहेत आणि पुन्हा एकदा लहान मुलांच्या संरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कालच ऋषिकेशमध्ये बॅग खरेदी करणाऱ्या दोन मैत्रिणींवर बैलाने हल्ला केला होता. ही घटना ताजी असताना आज पुन्हा एका चिमुकल्यावर माकडांनी हल्ला केला आहे आणि माणसांवर होणाऱ्या हल्ल्यांबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.