Video Shows Couple Cleaning Vegetables On Moving Train : लग्नानंतर महिलांच्या जबाबदाऱ्या खूप वाढतात. छोटे-मोठे निर्णयही विचारपूर्वक घ्यावे लागतात. निर्णय घेताना नवऱ्याकडून सल्ले किंवा मदत घ्यावी लागते. लग्नानंतर आनंदी वैवाहिक जीवनासाठी स्पर्धा टाळणे, गोपनीयता राखणे, एकमेकांच्या गरजा समजून घेणे आणि संयम बाळगणे, सुख-दुःखात मदत करणे या गोष्टी दोघांनाही एकमेकांसाठी कराव्या लागतात. तर आज सोशल मीडियावर हेच दाखविणारा एक व्हिडीओ (Video) व्हायरल होत आहे, जे पाहून तुमचेही डोळे पाणावतील एवढे तर नक्की…
आजकाल मुलं असो किंवा मुली पैसा, घर, गाडी बघून एखाद्या व्यक्तीला लग्नासाठी किंवा रिलेशनशिपसाठी “हो” म्हणतात. पण, तुमच्या प्रत्येक पावलावर तुमच्या पाठीशी उभी राहणाऱ्याची तुम्हाला खूप जास्त गरज असते, हे कुठेतरी सगळेच विसरून जातात. आज व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत असेच दृश्य पाहायला मिळाले. @storiesby_prashant इन्स्टाग्राम युजर ट्रेनमधून प्रवास करीत असते. यादरम्यान ट्रेनच्या दरवाजापाशी बसलेले एक जोडपे त्याला दिसते. नवऱ्याने परिधान केलेल्या गणवेशावरून तो सफाई कामगार वाटतो आहे. दोघेही भाजी निवडण्यासाठी एकमेकांना मदत करताना दिसत आहेत. एकदा पाहाच हा निरागस व्हिडीओ (Video) …
व्हिडीओ नक्की बघा…
साथ सदा निःस्वार्थ अशी लाभावी…
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, कोणतीही तक्रार न करता, बायको आपल्या नवऱ्याबरोबर ट्रेनच्या दरवाजापाशी बसली आहे. एवढेच नाही, तर दोघेही एकमेकांना भाजी निवडण्यास मदत करीत आहेत. हे दृश्य पाहून ट्रेनमध्ये प्रवास करणारा @storiesby_prashant युजर भारावून गेला. त्याने हा क्षण आपल्या फोनमध्ये रेकॉर्ड करून घेतला आणि ‘खांद्याला खांदा लावून त्याचा संसार तिने रेटला होता. एका साध्या माणसातही तिला राम भेटला होता’, अशी कॅप्शन देऊन हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @storiesby_prashant या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच नेटकरी हा व्हिडीओ पाहून नवरा-बायकोचे नाते कसे असते हे कमेंट्समध्ये त्यांच्या शब्दांत मांडताना दिसत आहेत. “साथ सदा निःस्वार्थ अशी लाभावी, हीच जणू पुरुषाची कमाई…..”, “एक गोष्ट खरी आहे श्रीमंत लोकांमध्ये. भांडण होऊन लगेच घटस्फोट होतात; पण या लोकांमध्ये तसं नाही होत. भांडतील, मारामारी करतील; पण साथ कधीच सोडणार नाहीत एकमेकांची. असेल त्या परिस्थितीत साथ देण्याची धमक असते. हेच खरं प्रेम”, “असा नवरा भेटायला खूप नशीब लागते. त्यांच्याकडे पैसा नाही; पण एकमेकांची साथ आणि प्रेम आहे” आदी नेटकऱ्यांनी केलेल्या अनेक कमेंट्स दिसत आहेत.