Office Dirty Water Video : सध्या कडक उन्हाळा सुरू आहे, त्यामुळे प्रत्येकालाच खूप तहान लागते. घरून निघाल्यापासून ते ऑफिसमध्ये पोहोचेपर्यंत बरोबर असलेली पाण्याची बाटली संपून जाते, पण तहान काही भागत नाही; अशावेळी आपण ऑफिसमध्ये पोहोचताच आधी बॅग ठेवतो आणि पटकन वॉटर डिस्पेंसरमधून बाटली भरून घटाघटा पाणी पितो. पण, तुम्ही ज्या वॉटर डिस्पेंसरमधून पाणी पिताय ते खरंच स्वच्छ असते का? याचा कधी विचार केलायत. नसेल तर आजपासून करा… कारण सोशल मीडियावर सध्या असा एक व्हिडीओ व्हायरल होतोय जो पाहून तुम्हाला आता ऑफिसमधील वॉटर डिस्पेंसरमधील पाणी प्यायचे की नाही असा प्रश्न पडेल.
अनेक ऑफिसमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वॉटर डिस्पेंसर पाहायला मिळतात, ज्यातील पाणी स्वच्छ असतेच हे समजून आपण पितो. पण, ते खरंच स्वच्छ असते का असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे; कारण त्यावर ऑफिस बंद असताना रात्रीच्या वेळी किती किटाणू, उंदीर फिरत असतील याचा विचारही आपण करत नाही. पण, व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्ही आता हा विचार कराल.
व्हायरल व्हिडीओत पाहू शकता की, एक बंद ऑफिस आहे, जिथे इतर ऑफिसेसच्या डेक्सप्रमाणे प्रिंटर, कॉम्प्युटरपासून सर्व वस्तू पाहायला मिळतायत. याचवेळी तिथे कर्मचाऱ्यांसाठी भिंतीला टेकवून एक वॉटर डिस्पेंसर ठेवला आहे, ज्यावर एक पाण्याचा मोठा बाटलादेखील आहे. यावेळी एका डेस्क खालून भला मोठा उंदीर धावत येतो आणि डिस्पेंसर मशीनवर चढतो. यानंतर मशीनच्या नळाला तोंड लावून पाणी पिण्याचा प्रयत्न करतो. काही सेकंद तो तसाच त्या मशीनला तोंड लावून उभा राहतो आणि नंतर पळून जातो. दरम्यान, ऑफिसमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा प्रकार कैद झाला आहे.
@gut.health.hub नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे, ज्यावर लोक आता विविध प्रकारच्या कमेंट्स करत आहेत. काहींनी म्हटले आहे की, यामुळे ऑफिसमध्ये कर्मचारी आजारी पडू शकतात, त्यांना उंदरांमुळे विविध रोग होऊ शकतात. तर एकाने म्हटले की, म्हणून मी ऑफिसमध्ये नेहमी स्वत:चा डब्बा, पाण्याची बाटली घेऊन जातो. तर काहींनी म्हटले की, हा व्हि़डीओ पाहिल्यानंतर आता चुकूनही कधीच ऑफिसमध्ये पाणी पिणार नाही.