Disabled Zomato delivery agent riding a bike: कितीही आव्हानं आली तरी आयुष्य जगता आलं पाहिजे. कष्ट आणि अथक परिश्रमानेच आपण यश गाठू शकतो, असं म्हणतात. जीवनात गरिबापासून श्रीमंतापर्यंत कष्ट कोणालाच चुकलेले नाहीत; फक्त त्याचे स्वरूप वेगवेगळे असू शकते. परंतु, जो तो आपापल्या परीने मेहनत घेतच असतो.

गरीब व्यक्ती पोटाची भूक भागविण्यासाठी मिळेल ते काम करीत असतात. त्यात अपंगत्व आलेलं असेल, तर आयुष्यात अनेक अडचणींना सामोरं जाण्यासाठी दुप्पट जिद्द आणि मेहनत लागते. अशा परिस्थितीत अनेक माणसं हतबल होतात, निराश होतात आणि स्वत:लाच दोष देऊ लागतात. पण, अशा परिस्थितीतही जिद्दीनं उभं राहत आपलं काम जो करतो, तोच आयुष्यात पुढे जातो. सध्या अशाच एका माणसाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय; ज्यात एक अपंग डिलिव्हरी मॅन पार्सल घेऊन डिलिव्हरी करण्यासाठी स्कूटरवरून जात आहे.

हेही वाचा… “मरता मरता वाचला भाऊ”, चालत्या ट्रेनमधून उलट्या दिशेने उतरला अन्…, VIDEO पाहून चुकेल काळजाचा ठोका

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये झोमॅटोची फूड डिलिव्हरी घेऊन एक अपंग डिलिव्हरी मॅन निघाला आहे. कौतुकास्पद बाब म्हणजे दोन्ही हात गमावलेले असूनही, हा माणूस आपली स्कूटर मॅप नेव्हिगेट करीत व्यवस्थितरीत्या चालविताना दिसतोय. एवढ्यात मागून एक बाईकस्वार येतो आणि त्या झोमॅटो डिलिव्हरी करणाऱ्या माणसाला विचारतो की, तुम्ही ही स्कूटर चालवू शकता का? यावर तो डिलिव्हरी मॅन फक्त मान हलवून होकारार्थी उत्तर देतो. “खूप छान काका, तुम्हाला पाहून खूप अभिमान वाटतो. खरंच तुम्हाला पाहून खूप छान वाटलं,” असं तो बाईकस्वार डिलिव्हरी करणाऱ्या माणसाला म्हणतो. त्यावर तो डिलिव्हरी बॉयही थँक्यू म्हणून स्मित करीत निघून जातो.

हा व्हायरल व्हिडीओ @rose_k01 या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘या झोमॅटो डिलिव्हरी मॅनसाठी प्रचंड आदर’ अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. हा व्हिडीओ पोस्ट केल्यापासून, त्यावर १८ हजारांपेक्षा जास्त व्ह्युज आले आहेत.

हेही वाचा… परिस्थिती सगळं काही शिकवते! डिलिव्हरी बॉयचा हा VIDEO पाहून प्रत्येकाच्या डोळ्यात येईल पाणी

युजर्सच्या प्रतिक्रिया

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया देत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत आणि डिलिव्हरी मॅनचं कौतुक केलं आहे. एका युजरनं कमेंट करीत लिहिलं, “अशा हीरोसाठी खूप आदर. हे खऱ्या जीवनातील हीरो आहेत; जे परिस्थिती आणि आयुष्याला दोष न देता, त्याला सामोरं जातात आणि दुसऱ्यांना आयुष्य जगायला शिकवतात.” तर दुसऱ्यानं “त्यांच्या धाडसाला आणि प्रयत्नांना सलाम; पण सुरक्षेसाठी त्यानं हेल्मेट घालायला हवं,” अशी कमेंट केली. तर एकानं, “आयुष्यातील सर्व अडचणींना झुगारून देणाऱ्या हीरोला देव आशीर्वाद देवो. खरा हीरो. साहेब तुम्हाला सलाम,” अशी कमेंट केली.