Hidden camera in public toilet: आपण अनेकदा हॉटेल रूम्समध्ये, चेंजिंग रूममध्ये लपवलेल्या कॅमेऱ्यांबद्दल ऐकलं असेल. हे कॅमेरे लावून त्यात लोकांचे अनेक खासगी क्षण रेकॉर्ड केले जातात. अशा अनेक घटना वारंवार समोर आल्या आहेत. म्हणून हॉटेल रूम्समध्ये गेल्यावर आपण अनेकदा ती नीट तपासून पाहतो. सध्या होणारे गैरप्रकार पाहता, सावध झालेले अनेक जण फोनची फ्लॅशलाईट सुरू करून, कुठे कॅमेरा लपवला आहे का हेदेखील तपासून पाहू लागले आहेत.
तसंच आता असे कॅमेरे लपवण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढतच चाललेत; पण आता तर हद्दच पार झाल्याचा नमुना समोर आला आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात एका बाथरूममध्ये एक कॅमेरा लपवला असल्याचं दिसून आलंय. हा कॅमेरा बाथरूममध्ये नेमका कुठे लपवलाय ते या व्हिडीओमध्ये एकदा पाहाच…
टॉयलेटमध्ये लपवला कॅमेरा
सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या व्हिडीओमध्ये एका सार्वजनिक ठिकाणी असलेल्या बाथरूममध्ये एक लहानसा कॅमेरा लपवलेला दिसतोय. आपल्या डोळ्यांना लगेच दिसणार नाही असा हा कॅमेरा टाइल्सच्या गॅपमध्ये लपवल्याचे दिसतेय.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @dnyan_vaani_marathi या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला ‘मुलींनो सावध राहा. बाथरूममध्ये असे कॅमेरे लावले जाऊ लावले शकतात’, अशी कॅप्शन देण्यात आली आहे. तसेच व्हिडीओ व्हायरल होताच त्याला सहा लाखांपेक्षा अधिक व्ह्युज आले आहेत. यादरम्यान, ही घटना नेमकी कुठे झाली हे अद्याप कळू शकलेले नाही.
युजर्सच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून अनेकांनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरनं कमेंट करीत लिहिलं, “कशी मानसिकता आहे, या लोकांची. काय जागा शोधून काढलीय यांनी”. दुसऱ्यानं कमेंट करीत लिहिलं, “पागल लोकांची कमी नाही आहे. विकृत लोक काहीही करतील”. तिसऱ्यानं, “इतका लहान कॅमेरा असतो का”, अशी कमेंट केली.
दरम्यान, जर तुम्हीही हॉटेल्स, चेंजिंग रूम किंवा सार्वजनिक ठिकाणी बाथरूमचा वापर करीत असाल, तर सावध राहा. या व्हिडीओमुळे नागरिकांमध्ये सध्या चिंता आणि भीतीचं वातावरण पसरलं आहे.