MahaKumbh Digital snan: उत्तर प्रदेशमधील महाकुंभमेळ्यात आतापर्यंत ५० कोटी भाविकांनी भेट देऊन त्रिवेणी संगमावर स्नान केल्याचा दावा योगी सरकारकडून केला जात आहे. महाकुंभ संपण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. अशातच गंगा, यमुना आणि कथित सरस्वती नदीचा जिथे संगम होतो, त्या संगमाची ओढ अनेकांनी लागली आहे. पण ट्रेनची तिकीटे उपलब्ध नाहीत, रस्त्यावर अभूतपूर्व अशी वाहतूक कोंडी आणि चेंगराचेंगरीच्या घटनांमुळे अनेकांना अद्याप महाकुंभला जाता आलेले नाही. अशा भाविकांना आता घरबसल्या डिजिटल स्नानाची संधी देणाऱ्या एका अजब स्टार्टअपची माहिती समोर आली आहे. ११०० रुपयांमध्ये डिजिटल स्नान उपलब्ध करून देऊ असे सांगणाऱ्या नवउद्यमीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती त्याच्या स्टार्टअप बद्दल माहिती देत आहे. ११०० रुपये पाठविल्यानंतर या व्यक्तीला भाविक स्वतःचा फोटोही पाठवतात. त्यानंतर सदर उद्यमी त्या फोटोची प्रिंट काढून संगमावरील पाण्यात ते विसर्जित करतो. अशाप्रकारे डिजिटल स्नानाची संधी देत असल्याचा दावा या नवउद्यमीने केला आहे.

सदर व्हिडीओमध्ये हा व्यक्ती स्वतःची ओळख दीपक गोयल अशी करून देतो. दीपक स्वतः प्रयागराजमध्येच राहत असल्याचे सांगतो. या स्टार्टअप व्यवसायाची माहिती देताना तो लोकांना त्यांचे फोटो व्हॉटसॲपवरून पाठविण्यास सांगतो. ज्याची प्रिंटआऊट काढून तो २४ तासांच्या आत ते फोटो संगमावरील पाण्यात बुडवेल, असा दावा करतो.

दीपक गोयलचा व्हिडीओ युट्यूबर आकाश बॅनर्जीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. “काळाच्या पुढची कल्पना, भविष्यातील युनिकॉर्न कंपनीची झलक दिसली”, असे कॅप्शन बॅनर्जीने व्हिडीओला दिले आहे. बॅनर्जी यांनी हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. बॅनर्जी यांच्या पोस्टला १ लाख २८ हजार लोकांनी लाईक केलेले आहे. तर ४५ लाखहून अधिक व्ह्यूज या व्हिडीओला मिळाल्या आहेत. तसेच एक्सवरही आता हा व्हिडीओ अनेकजण शेअर करत आहेत.

अनेकांनी या क्लुप्तीचे कौतुक केले असले तरी काही जणांनी टीकाही केली आहे. सामान्य भाविकांच्या निरागसतेचा आणि भक्तीचा गैरफायदा घेऊन पैसे कमविले जात आहेत, अशी टीका काहींनी केली. तर काहींनी या विनोदी कल्पनेचे स्वागत करत गोयल खरा उद्योजक असल्याचे म्हटले आहे.

एका युजरने उपरोधिकपणे म्हटले की, चीनकडे डीपसीक असेल तर आपल्याकडे डीपस्नान आहे. तर दुसऱ्या युजरने म्हटले, “आता डिजिटल इंडिया खऱ्या अर्थाने देश शोभतो.” आणखी एकाने म्हटले की, ही कल्पना कोट्यधीश बनवू शकते.

एका व्यक्तीने म्हटले की, देशात बेरोजगारी इतकी वाढली आहे की, अशापद्धतीची शक्कल लढवून लोक पैसे कमविण्याचा प्रयत्न करत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video of man offering digital photo snan service at maha kumbh leaves internet in stitches kvg