Anand Mahindra impressed with moving sofa : देशातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. ते त्यांच्या आवडीचे आणि मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करीत असतात. त्यात काही व्हिडीओ खरोखरच खूप क्रिएटिव्ह असतात. दरम्यान, अलीकडेच त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे; जो पाहून लोक प्रभावित झाले आहेत. या व्हिडीओत दोन तरुण एका सोफ्याचे वाहनात रूपांतर करतात आणि नंतर त्या सोफ्यावर बसून राईडचा आनंद लुटतात.
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, दोन तरुण ऑनलाइन सोफा ऑर्डर करतात. त्यानंतर स्वत: डिझाइन तयार करून, त्या सोफ्यात चाके आणि एक मोटर फिट करतात. दोघांनी आपले इंजिनियरिंग कौशल्य वापरून सोफ्याचे वाहनात रूपांतर केले आहे. त्यानंतर दोघेही त्यावर बसून, संपूर्ण शहर फिरायला जातात. जरी त्यांनी हा सोफा मजेशीर ढंगाने तयार केला असला तरी त्यातील त्यांचे क्रिएटिव्हिटी आणि ऑटोमोबाइल कौशल्य अत्यंत प्रभावी आहे; जे पाहून दिग्गज उद्योगपती आनंद महिंद्राही प्रभावित झाले आहेत. त्यांनी हा व्हिडीओ एक्सवर पोस्ट करीत त्यांचे कौतुक केले आहे.
आनंद महिंद्रा यांनी स्तुती करीत लिहिले की, याला फक्त एक मजेदार प्रोजेक्ट म्हणता येईल; परंतु तो बनवताना किती काळजी घेतली गेली असेल आणि किती ऑटोमोटिव्ह कौशल्य वापरले गेले असेल? अविश्वसनीय आहे. कोणत्याही देशाला ऑटोमोबाइल क्षेत्रात सर्वश्रेष्ठ बनवण्यासाठी अशा सर्जनशील अभियंत्यांची आवश्यकता आहे. पण, भारतात नोंदणी करण्यासाठी असे वाहन आरटीओ कार्यालयात नेले, तर अधिकारी काय प्रतिक्रिया देतील, अशी प्रतिक्रिया आनंद महिंद्रांनी दिली आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.