उंच इमारतींच्या गॅलरींमधून लहान मुलं खाली पडल्याच्या अनेक दुर्दैवी घटना आपण आजपर्यंत वाचल्या किंवा पाहिल्या असतील. पण एखाद्या आईनेच आपल्या मुलाला इमारतीच्या १० व्या माळ्यावरुन लटकवल्याचं तुम्ही कधी ऐकलं किंवा पाहिलं नसेल. पण अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे ज्यामध्ये महिलेने चक्क आपल्या मुलालाच उंच इमारतीच्या गॅलरीतून खाली उतरण्यास भाग पाडलं. फरिदाबादमध्ये ही घटना घडली आहे.
या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत महिला आपल्या मुलाला नवव्या माळ्यावरील गॅलरीत उतरवताना दिसत असून नंतर बेडशीटच्या सहाय्याने वरती खेचत असल्याचं दिसत आहे. पण असं करण्यामागचं कारण काय? कारण ऐकून तुमचाही संताप होईल. कारण महिलेने फक्त एका साडीसाठी आपल्या मुलाचा जीव धोक्यात टाकला होता.
महिलेची साडी खालच्या म्हणजेज नवव्या माळ्यावरील गॅलरीत पडली होती. घर बंद असल्याने ती साडी मिळवण्यासाठी महिलेने चक्क आपल्या मुलालाचा गॅलरीतून खाली उतरवलं. व्हिडीओत महिला आणि इतर कुटुंबीय बेडशीटच्या सहाय्याने त्याला वरती खेचताना दिसत आहेत.
फरिदाबादमधील सेक्टर ८२ मध्ये गेल्या आठवड्यात ही घटना घडली. समोरील इमारतीमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने हा व्हिडीओ काढला आहे. शेजाऱ्यांच्या माहितीप्रमाणे महिलेने मुलाचा जीव धोक्यात घालण्याआधी साडी मिळवण्यासाठी इतर कोणता मार्ग आहे का यासंबंधी कोणाचाही सल्ला घेतला नव्हता.
एका शेजाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, “६ किंवा ७ फेब्रुवारीला ही घटना घडली. साडी मिळवण्यासाठी महिलेने मुलाला खाली उतरवलं होतं. इतकी जोखीम उचलण्याआधी त्यांनी सोसायटीशी संपर्क साधायला हवा होता”. सोसायटीने महिलेला नोटीस बजावली असून महिलेने आपल्या निर्णयाचा खेद वाटत असल्याचं म्हटलं आहे.