Video Shows Elderly Women Selling Avocado In Mumbai Local : वेळ कुणासाठी थांबत नाही, असे म्हणतात. आपण खर्च केलेला पैसा, विकलेले सोने पुन्हा कमवू आणि बनवू शकतो. मात्र, एकदा निघून गेलेली वेळ कधीच, कोणासाठीही परत येत नाही. त्यामुळे वेळेनुसार बदलणे, त्याचा आनंद घेणे फारच गरजेचे असते. अनेकदा मी आहे तसा राहणार, असे म्हणणारा माणूसदेखील वेळेनुसार नकळत स्वतःला बदलतोच. तर आज याच गोष्टीचे उत्तम उदाहरण व्हायरल व्हिडीओत पाहायला मिळाले आहे, जे पाहून तुम्हाला नवल आणि दुःख दोन्ही वाटेल.
प्रवाशांच्या गरजा आणि काळानुसार होणारा बदल लक्षात घेऊन मुंबई लोकलमध्ये अगदी टिकल्यांच्या पाकिटांपासून ते पुरणपोळीपर्यंतचे पदार्थ विकले जातात. तसेच आरोग्यदायी खाण्यासाठी अनेक जण आता अॅव्होकॅडो, प्लम यांसारख्या फळांकडे वळू लागले आहेत. त्यामुळे मार्केटमध्येसुद्धा ही फळे आवर्जून विक्रेत्याकडे दिसतात. तर असाच बदल आज एका मुंबई लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलेला दिसला. तिने एका आजीच्या टोपलीत अशी गोष्ट पाहिली की, ज्यामुळे जीवनात बदल आवश्यक असतो यावर तिचा विश्वास बसला.
जी मज्जा करवंदे खाण्यात आहे, ती अॅव्होकॅडोमध्ये येणारच नाही (Viral Video)
व्हायरल व्हिडीओ मुंबई लोकलचा आहे. मुंबई लोकलमध्ये एक आजी टोपलीतून अॅव्होकॅडो विकताना दिसत आहे. हे पाहून @granthtrisha इन्स्टाग्राम युजरला पूर्वीचे दिवस आठवले. जेव्हा ट्रेनमध्ये काही महिला बोरं आणि करवंद विकायच्या. पण, आता बदलता काळ आणि प्रवाशांची आवड लक्षात घेऊन, आजी अॅव्होकॅडो विकत आहेत हे पाहून ती भारावून गेली आणि हा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर ‘पूर्वी आजीच्या टोपलीत करवंद, बोरं दिसायची आणि आता आजी प्लम आणि अॅव्होकॅडो विकतेय’, अशी कॅप्शन देऊन शेअर केला.
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @granthtrisha या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘काळानुरूप माणसाला बदलावं लागतं हे खरं’, अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ पाहून नेटकरीसुद्धा “जी मज्जा करवंदे खाण्यात आहे, ती अॅव्होकॅडोमध्ये येणारच नाही”, “बोरं आणि करवंद शेतातली आणि रानातून जमवलेली असायची. हे तर मार्केटमधून आणलेले असतील”, “काळानुसार बदल गरजेचा आहे; पण या वयातदेखील आजीला इतकी मेहनत करावी लागत आहे”, “पण आजी तीच आहे ही आपली जुनी माणसं सोन्यापेक्षा मौल्यवान” आदी अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्याचे दिसत आहेत.