काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर झालेल्या आरोपांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घेरलं. तसेच मोदींना काही प्रश्न विचारत त्याची उत्तरं देण्याचं आव्हान दिलं. यानंतर मोदींनी संसदेत भाषण करत सरकारच्या कामांची माहिती देत विरोधकांना टोले लगावले. विशेष म्हणजे मोदींच्या या भाषणाच्यावेळी संसद घोषणांनी दणाणून गेली होती. एकीकडे मोदी-अदाणी भाई-भाईच्या घोषणा देत होते. दुसरीकडे भाजपा खासदार मोदींच्या भाषणाला दाद देत बाक वाजवत होते आणि मोदी-मोदीचा जयघोष करत होते. याचाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यात मोदींचं भाषण सुरू असताना सर्व खासदार बाक वाजवत आहेत, मात्र एक भाजपा खासदार या जयघोषात सहभागी होताना दिसत नाही. त्याची जोरदार चर्चा आहे.
व्हिडीओत नेमकं काय?
या व्हिडीओत नरेंद्र मोदी म्हणत आहेत, “जनतेचा मोदींवरील विश्वास वर्तमानपत्रातील बातम्यांवरून तयार झालेला नाही. मोदींवर हा विश्वास टीव्हीवरील चमकणाऱ्या चेहऱ्यांमुळे निर्माण झालेला नाही. देशाच्या उज्वल भविष्यासाठी आयुष्यातील प्रत्येक क्षण आणि क्षण खर्च केला आहे.”
मोदींच्या आक्रमक भाषणावर भाजपाचे सर्वच खासदार आणि मंत्री बाक वाजवून दाद देताना दिसत आहेत. मात्र, या सर्व गर्दीत भाजपा खासदार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मात्र बाक न वाजवता शांतपणे बसलेले दिसत आहेत. त्यावरूनच सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. काही सोशल मीडिया युजर्स याला गडकरींचा स्वाभिमान म्हणत आहेत. तसेच पंतप्रधान मोदींवर टीका करत आहेत.
दुसरीकडे मोदींच्या भाषणाचा हा व्हिडीओ भाजपाच्या अधिकृत हँडलवरूनही शेअर करण्यात आला आहे. मात्र, या व्हिडीओत नितीन गडकरी दिसत नाहीत. मोदींचं भाषण सुरू असताना गडकरी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या शेजारी बसलेले पाहायला मिळत आहेत. त्यामुळे या व्हिडीओत गडकरी दिसत नसले तरी त्यांचा काही भाग दिसत आहे. त्यानुसार मोदींच्या भाषणानंतर गडकरी सुरुवातीला काही क्षण बाक वाजवतात. मात्र, नंतर भाजपाचे सर्व खासदार मोदी-मोदी करत बाक वाजवतात. तेव्हा गडकरी शांत असल्याचं दिसतं.