धबधब्याखाली पाण्यात बोटीमध्ये बसून आनंद लुटत असतानाच भलामोठा खडक कोसळल्याने सात पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला आहे. ब्राझीलमध्ये ही दुर्घटना घडली असून नऊ जण जखमी झाले आहेत. थरकाप उडवणारा दुर्घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शनिवारी ही दुर्घटना घडली असून हे सर्वजण मोटरबोटमध्ये बसले होते असं वृत्त रॉयटर्सने दिलं आहे.
ब्राझीलमध्ये पर्यटकांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या कॅपिटोलियो कॅनयॉन (Capitolio Canyon) येथे ही दुर्घटना घडली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये डोंगरावरील खडकाचा एक भाग कोसळून खाली पाण्यात असलेल्या बोटींवर कोसळताना दिसत आहे. खडक कोसळत असल्याचं जाणवताच यावेळी काही बोटी दूर जाताना दिसत आहेत. मात्र या दोन बोटींमधील पर्यटकांना संधी मिळत नाही आणि त्या विशाल दगडाखाली येतात.
यावेळी तीन लोक बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. जखमींना तेथील स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. इतका मोठा खडक अंगावर कोसळल्याने अनेकजण गंभीर असून कित्येक हाडं मोडली आहेत. अनेकांच्या डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर जखमा झाल्या आहेत. जवळपास २३ जणांना किरकोळ जखमा असून उपचारानंतर त्यांना सोडण्यात आलं आहे.
ब्राझीलमधील नौदलाने या दुर्घटनेचं नेमकं कारण काय आहे हे जाणून घेण्यासाठी चौकशी बसवणार असल्याचं सांगितलं आहे. या परिसरात दोन आठवडे जोरदार पाऊस झाला होता. त्यातूनच ही दुर्घटना झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.