रशियानं युक्रेनवर आक्रमण केल्यापासून अनेक देशांनी रशियावर निर्बंध लादले आहेत. यामध्ये आर्थिक आणि आयात-निर्यातीसंबंधीत निर्बंधांचा समावेश आहे. या निर्बंधाचा फटका रशियन नागरिकांना बसत असून त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. रशियामध्ये दैनंदिन वापरासाठी लागणाऱ्या वस्तुंच्या किमतीत वाढ झाली आहे. परिणामी लोक एकमेकांच्या हातातील वस्तू हिसकावताना दिसत आहेत. रशियाच्या सुपरमार्केटमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
‘कच्चा बादाम’नंतर ‘कच्चा अमरुद’ची क्रेझ; पेरूवाल्या काकांचं हे Viral गाणं ऐकलंत का?
युक्रेनवरील हल्ल्यानंतर लागू करण्यात आलेल्या आर्थिक निर्बंधांमुळे आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर रशियामधील काही दुकानांनी प्रति ग्राहक १० किलो साखरेची मर्यादा निश्चित केली आहे. रशियामध्ये निर्बंधांनंतर साखरेच्या किमती गगनाला भिडल्या आहेत आणि २०१५ नंतरची सर्वोच्च वार्षिक महागाई पाहायला मिळत आहे. दुकानात साखर खरेदीसाठी धक्काबुक्की आणि मारामारीचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे.
रशियन अधिकारी एकीकडे देशात साखरेचा तुटवडा नसल्याचं सांगत आहेत. परंतु व्हायरल व्हिडीओंमुळे तिथल्या अडचणी लोकांसमोर येऊ लागल्या आहेत. दरम्यान रशियन सरकारने देशातून साखरेच्या निर्यातीवरही तात्पुरती बंदी घातली आहे. रशियामध्ये साखरेची किंमत ३१ टक्क्यांनी वाढली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे अमेरिका आणि अनेक पाश्चात्य देशांनी घातलेले कडक निर्बंध. याशिवाय इतर अनेक उत्पादनेही महाग झाली असून त्याचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे.