Viral Video: सध्या लग्नसराईचे दिवस सुरू असून, लग्नातील अनेक मजेशीर किस्से सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. लग्नात वर आपल्या वधूला काय स्पेशल गिफ्ट देणार याकडेही अनेकांचं लक्ष असतं. असंच एक हटके गिफ्ट पाकिस्तानातील एका वरानं आपल्या नववधूला दिलं आहे. हे गिफ्ट देतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे; जो पाहून युजर्स नवऱ्याला ट्रोल करताना दिसत आहेत. तर, अनेक जण नवऱ्याची खिल्ली उडविताना दिसत आहेत.
पाकिस्तानी पतीने पत्नीला दिले हटके गिफ्ट
पाकिस्तानी नागरिक कधी काय करतील याचा काही नेम नाही. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी सैनिक हेलिकॉप्टरद्वारे गव्हाची शेती सुकवीत होते, असा दावा एका व्हिडीओच्या माध्यमातून नुकताच केला जात होता. दरम्यान, आता पुन्हा एक असाच मजेशीर व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला असं दिसतंय की, नुकतंच लग्न पार पडलेले पाकिस्तानी वर-वधू स्टेजवर उभे होते. यावेळी वर आपल्या नववधूला गिफ्ट देण्यासाठी हातात घेतो आणि ते उघडण्याचा प्रयत्न करतो. तेवढ्यात वधूला त्या गिफ्टमध्ये कोणाचा तरी फोटो दिसतो. फोटो पाहून ती मोठमोठ्यानं हसू लागले. पत्नीला हसताना पाहून पतीदेखील मोठमोठ्यानं हसतो आणि हातातील फोटो समोर उभ्या असलेल्या सर्वांना दाखवतो. यावेळी पतीच्या हातात पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा फोटो होता. हा फोटो पाहून स्टेजसमोर उभी असलेली सगळी मंडळी हसू लागतात.
हा व्हिडीओ X (ट्विटर)वरील @Mahvish- या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे आणि या व्हिडीओला आतापर्यंत जवळपास सात लाखांहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत. तसेच एक हजारहून अधिक जणांनी या व्हिडीओला लाइक केलं आहे.
हेही वाचा : माणुसकी अजूनही जिवंत! अंधाऱ्या जागेत अडकलेल्या श्वानाला तरुणाने अशी केली मदत; युजर्स म्हणाले…
पाहा व्हिडीओ :
हा व्हिडीओवर एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय, “बहुतेक पती इम्रान खानला आदर्श मानतो. त्यामुळेच त्यानं असं गिफ्ट पत्नीला दिलं.” तर दुसऱ्या युजरनं लिहिलंय, “इम्रान खानसोबत कोणताच राजकीय संबंध नाही, हे एक प्रेम आहे.” तसेच अनेक जण हे गिफ्ट दिल्यामुळे त्याला ट्रोलदेखील करताना दिसत आहेत.
दरम्यान, इम्रान खान २०१८ ते २०२२ या कालावधीत पाकिस्तानचे पंतप्रधान होते. मात्र, २०२३ मध्ये निवडणूक आयोगाकडून त्यांना तीन वर्षांचा तुरुंगवास सुनावण्यात आला होता.