आज आपण कुठल्याही लहान-मोठ्या शहरांमध्ये गेलो, तर पार्किंगची समस्या उदभवते. तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की, गाडी कुठे पार्क करायची? हा प्रश्न गाडी चालकांसमोर उभा राहतो. तसेच नो पार्किंगमध्ये गाडी उभी केल्यास टोईंग वाहन आपली गाडी घेऊन जाऊ शकते ही भिती प्रत्येकाच्या मनात असते. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ; या व्हिडीओत टोईंग कर्मचारी चक्क वृद्ध जोडप्यांसह कार टोइंग करताना दिसत आहेत.
नोएडा अथॉरिटीचे पार्किंग अटेंडंट म्हणजेच टोईंग वाहनातील कर्मचाऱ्यांनी एक कार टोइंग केल्याचे दृश्य व्हिडीओत दिसत आहे . पण , गाडीत एक वृद्ध जोडपे बसले आहे. हे वृद्ध जोडपं नोएडा सेक्टर ५० मार्केटमध्ये सामान खरेदी करण्यासाठी आले होते. तेव्हा तेथे उपस्थित टोईंग वाहन कर्मचाऱ्यांनी त्यांची कार ओढून नेली. कारमध्ये वृद्ध जोडपे होते. वृद्ध जोडप्याने कर्मचाऱ्यांना गाडी घेऊन न जाण्यास विनंती केली तरीही त्यांनी ही कार वृद्ध जोडप्यासह ओढत नेली.
व्हायरल होणारा हा व्हिडीओ एका दुचाकीस्वाराने शूट केला असून त्याने ही संपूर्ण घटना सोशल मीडियावर व्हायरल केली . कारच्या पुढच्या सीटवर वाहन चालक, वृद्ध महिला आणि मागच्या सीटवर पुरुष बसल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. व्हिडीओमध्ये वृद्ध पुरुष हात जोडून, त्यांना सोडवण्यासाठी विनंती करतानाही दिसून आले आहेत.
हेही वाचा…लेकीच्या दुखापतीच्या ‘त्या’ प्रसंगाने आनंद महिंद्रांना शिकवला ‘हा’ धडा; म्हणाले, ‘घराच्या अंगणात…’
व्हिडीओ नक्की बघा…
वृद्ध जोडप्याला कारमध्ये बसून ओढत नेतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर टोईंग वाहन कर्मचाऱ्यांच्या वर्तनाबद्दल कारवाई करावी अशी मागणी केली जाते आहे. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये आणि त्यांच्यासारख्या वृद्ध जोडप्याला अशा अत्याचाराला सामोरे जावे लागू नये यासाठी अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे ; असे सर्व युजर्स कडून सांगण्यात येत आहे.
तर हे बघता नोएडा प्राधिकरणाने या प्रकरणाच्या संदर्भात एक निवेदन जारी केले आहे आणि टोईंग वाहन कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. नोएडा प्राधिकरणाने त्यांच्या @noida_authority अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून हा व्हिडिओ पुन्हा शेअर करीत म्हटले आहे की, “नोएडा प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांच्या सूचनांचे पालन करून टोईंग वाहन कार्यमचाऱ्यांच्या विरुद्ध पोलिस अहवाल दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेत कंत्राटदाराचा हात आहे” ; अशी कॅप्शन या पोस्टला दिली आहे. तर पोलिसांनी एक्सवर व्हायरल झालेल्या व्हिडीओवर कमेंट केली आहे की, ‘आम्ही व्हिडीओची चौकशी करत आहोत. चौकशीनंतर पुढील कारवाई करण्यात येईल’ .