मुंबईकरांना ट्रेनची भांडणं काही नवीन नाहीत. कधी सीटवरून, ट्रेनमध्ये चढण्यावरून, गर्दीमुळे भांडणं होत असतात. त्याहून फार काही वेगळं कारण लोकांकडे नसतं. पण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला एका भांडणाचा व्हिडीओ पाहिला की ते भांडण नेमकं कशासाठी चाललंय हे कळू येत नाही, मात्र व्हिडीओचा शेवट पाहिला की, ‘बरं झालं बाकीच्या प्रवाशांनी त्याला चोपला’ असं वाक्य तुमच्या तोंडून आल्याशिवाय राहणार नाही.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती मेट्रो ट्रेनमध्ये आक्रमक माणूस भरलेल्या मेट्रो ट्रेनच्या मध्यभागी उभा असल्याचं दिसून येत आहे. काही सेकंदानंतर तो तो शिवीगाळ करू लागतो आणि जोरजोराने भांडू लागतो. या व्हिडीओमध्ये त्याला आवाज स्पष्ट ऐकू येत नाही. अचानक हा व्यक्ती कुणाशी भांडतोय, हे सुरूवातीला काही कळू येत नाही. काही सेकंदानंतर ट्रेनमध्येच दरवाज्याच्या बाजुला एक महिला उभी असलेली दिसून येतेय. या महिलेला तो भांडत असल्याचं लक्षात येतं. त्या महिलेला तो अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून मारण्याची सुद्धा धमकी देऊ लागतो. यात महिला देखील निर्भीडपणे त्याचा सामना करताना दिसून येतेय. हा आक्रमक व्यक्ती धमकी देत असताना सुद्धा ती निडरतेने त्याच्या समोर उभी राहते. तो या महिलेशी भांडण्यात एवढा गर्क होता की, आपल्याकडे चार लोक पाहतायेत याचंही भान त्याला नव्हतं.
काही क्षण त्याच्याकडे पाहिल्यानंतर सर्वजण आपआपल्या मोबाइलमध्ये पाहायला लागतात. या व्यक्तीचं भांडण जेव्हा त्या महिलेच्या सहनशक्तीच्या पलिकडे जाऊन पोहोचतं त्यावेळी ही महिला व्यक्तीला काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करते. हे पाहून हा आक्रमक व्यक्ती महिलेच्या अंगावर धावून येतो. हे पाहून तिथेच असलेली बाकीचे प्रवासी त्या महिलेच्या मदतीसाठी धावून येतात. त्यातले काही पुरूष पुढे येत त्या आक्रमक व्यक्तीला महिलेपासून दूर करतात आणि त्याला ओढत ओढत खाली पाडून चांगलाच चोप दिला.
ही घटना नेमकी कुठची आहे हे अद्याप कळू शकलेलं नाही. मात्र गेल्या शुक्रवारी ही घटना घडली असल्याचं सांगण्यात येतंय. महिलेशी हुज्जत घालणाऱ्या या आक्रमक व्यक्तीला प्रवाशांनीच चांगला धडा शिकवत असताना त्याच ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या दुसऱ्या प्रवाशाने ही घटना त्यांच्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली आणि सोशल मीडियावर शेअर केली. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागला आहे. एका महिलेच्या संरक्षणासाठी ट्रेनमधले प्रवासी एकत्र येत त्या आक्रमक व्यक्तीला चोप दिलेला पाहून नेटिझन्स या व्हिडीओच्या कमेंट्स सेक्शनमध्ये कौतुकाचा वर्षाव करताना दिसून येत आहेत.