‘संकटात मदत करतो तोच खरा मित्र’ हे आपण नेहमी ऐकतो. मैत्रीच्या आणाभाका घेत प्रत्येक जण आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर हे नाते जपत असतो. प्रसंगी मित्राच्या मदतीसाठी धावून जाताना आपण काळवेळही पाहत नाही. मैत्रीचे दर्शन घडविणारी एक घटना नुकतीच घडली. शेतात काम करणाऱ्या आपल्या मित्राला भूक लागली असताना त्याला सँडविच देण्यासाठी एका पठ्ठ्याने काय केले हे पाहून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल.

अमेरिकेच्या उत्तर डाकोटा भागातील एका शेतात काम करणाऱा मिशेल विर्थ काम करुन दमला. त्याचा डबाही घरी विसरला होता आणि त्याला जोरदार भूक लागली होती. त्याच्या शेताजवळ लगेच खाण्यासाठी मिळू शकेल असे दुकान नव्हते. तसेच याठिकाणी तो बाहेरुन ऑर्डरही करु शकत नव्हता. आता काय करायचे असा प्रश्न पडला असतानाच त्याने आपल्या मित्राला फोन केला आणि आपल्याला भूक लागल्याचे सांगितले. त्यावेळी वैद्यकीय उपचार करुन निघालेल्या नॅथन होवाट या २३ वर्षीय तरुणाने आपल्या मित्राला मदत करायची ठरवली आणि तो थेट विमानानेच निघाला. खरी गंमत तर पुढे आहे, त्याने विमानातूनच आपल्या मित्रासाठी ‘सब-वे’चे सँडविच खाली टाकले.

आपला मित्र उपाशी राहू नये यासाठी नॅथनने अशी अनोखी शक्कल लढवली. नॅथन याच्याकडे विमान चालविण्याचा परवाना होता. त्यामुळे डेव्हिल्स लेक या ठिकाणहून जात असताना त्याने मिशेलला जेवण दिले. विशेष म्हणजे त्याने खाली टाकलेले सँडविच मिशेल जिथे होता तिथेच पडले. शेतात घाम गाळून दमलेल्या मिशेलला आपल्या मित्राने केलेल्या या कामगिरीचे खूप कौतुक वाटले. नॅथन याने आपल्या फेसबुक अकाऊंटवर याविषयीचा व्हिडिओ आणि फोटो अपलोड केले आहेत. त्याने आपल्या मित्रासाठी केलेल्या या कामगिरीसाठी त्याचे सर्वच स्तरातून मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. याशिवाय अनेक जण आपल्या मित्राचा फोटो फेसबुकवर टॅग करत त्यांनाही असे करण्यास सांगत आहेत.

Story img Loader