हल्ली ऑनलाईन शॉपिंगचा ट्रेंड वाढला असल्याने प्रत्येक जण घरात उपयोगी येणाऱ्या वस्तूपासून ते इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस, कपडे, स्मार्टफोन्ससह अनेक वस्तू सहज ऑनलाइन ऑर्डर करतात. विशेष म्हणजे बाजारात जाऊन खरेदी करण्याऐवजी सहज स्वस्तात घरबसल्या ऑनलाइन मागवता येत असल्याने सर्वांना ऑनलाइन खरेदी करणं सोयीचं झालेलं आहे. पण तुमच्या घरी तुमचं पार्सल येण्यापूर्वी कोणत्या कोणत्या परिस्थितीतून हे पार्सल येतं? याचा विचार कधी केलाय का? मग हा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच.

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये अ‍ॅमेझॉनच्या शेकडो पार्सलचा अक्षरशः ढिगाराच पडलेला दिसून येतोय. ट्रेनमधून काही पोर्टर्स ही अ‍ॅमेझॉनचे पार्सल फेकून देताना दिसून येत आहेत. रेल्वे प्लॅठफॉर्मवर जिकडे तिकडे सगळीकडे पार्सलच पार्सल दिसून येत आहेत. यातील काही पॅकेजमध्ये इतर ई-टेलर्सचे काही पार्सल असण्याची शक्यता आहे, परंतु व्हिडीओमध्ये दिसणार्‍या बहुतेक पॅकेजेसवर Amazon चा लोगो दिसून येत आहे. ट्रेनमधली माणसं अ‍ॅमेझॉनचे हे पॅकेजेस फेकून का देत आहेत, असा प्रश्न लोकांना पडला आहे. लोक हा व्हिडीओ वारंवार पाहून हा प्रकार नक्की काय आहे, हे समजून घेण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ आसाममधल्या गुवाहाटीमधला असल्याचं सांगण्यात येतंय. गुवाहाटी रेल्वे स्थानकात हे पॅकेज नवी दिल्ली दिब्रुगड राजधानी एक्सप्रेस (१२४२४) ट्रेनमधून आणण्यात आले आहेत. हा व्हिडीओ १४ मार्च रोजी रेकॉर्ड करण्यात आला होता. परंतू आता तो नव्याने व्हायरल होऊ लागलाय.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ईशान्य फ्रंटियर रेल्वेने एक निवेदन जारी केले. यात त्यांनी या व्हिडीओवर स्पष्टीकरण देत म्हटलं की, पॅकेज हाताळणारे हे भारतीय रेल्वेचे कर्मचारी नाहीत. “पार्सल हाताळणाऱ्या व्यक्तींची व्यवस्था ज्यांनी हे पार्सल घेण्यासाठी व्हॅन भाडेतत्वावर घेतली आहे ते करत असतात. नियमानुसार, त्यांच्या क्लायंटचे पार्सल एसएलआर/पार्सल व्हॅनमधून लोड/अनलोड करणे ही त्या टीमची एकमात्र जबाबदारी आहे,” असेही त्यात म्हटले आहे.

हा व्हिडीओ yabhishekhd नावाच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. त्यानंतर तो बघता बघता व्हायरल सुद्धा झाला. या व्हिडीओला आतापर्यंत २.६ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत. तर ४० हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. या व्हिडीओमध्ये पार्सल ज्या पद्धतीने हाताळले गेले त्याबद्दल काही लोकांनी भीती व्यक्त केली, काही इतरांनी निदर्शनास आणले की पोर्टर्सना पॅकेजेस अनलोड करण्यासाठी फारच कमी वेळ असतो. सत्या टी (@SatyaT79397214) यांनी ट्विट केले की, “नाण्याची दुसरी बाजू: त्या पोर्टर्सना पार्सल उतरवायला मर्यादित वेळ असते. ट्रेन कोणत्याही मोठ्या स्टेशनवर जास्तीत जास्त १० मिनिटे आणि छोट्या स्टेशनवर २ मिनिटे थांबते. त्या वेळेत त्यांना हे शेकडो पार्सल उतरवावे लागते. त्यांच्या दृष्टिकोनातून विचार करा.” रुक्मणी वर्मा (@पॉइंटपॉन्डर) या आणखी एका यूजरने कमेंटमध्ये लिहिले की, “काहीही असलं तरी, अशा प्रकारे पार्सल हाताळणाऱ्या लोकांवर कारवाई करणे आवश्यक आहे. अन्यथा ज्यांचे हे पार्सल असतील त्यांच्यासाठी ही एक भयानक परिस्थिती आहे.”

Story img Loader