Viral Video: ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ या वाक्याप्रमाणेच प्रत्येक व्यक्तीचे आयुष्य त्याच्या आईशिवाय अपूर्ण असते. या जगात आईएवढे प्रेम तिच्या मुलांवर कोणीही करू शकत नाही. मग ती आई एखादी व्यक्ती असो किंवा प्राणी, पक्षी असो; आई नेहमीच प्रत्येक गोष्टीत स्वतःआधी आपल्या लेकरांचा विचार करत असते. स्वतःचे घाव विसरून मुलांसाठी झटते. त्यांची सर्व स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते. आईच्या तिच्या मुलांवरच्या प्रेमाची एक नाही लाखो उदाहरणं आहेत, ज्यातून मुलांबद्दलचे निस्वार्थ प्रेम दिसून येते. सध्या एका शेतातील एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे, ज्यात एक टिटवी आपल्या अंड्यांचे रक्षण करण्यासाठी असं काहीतरी करते.
सोशल मीडियावरील अनेक व्हायरल व्हिडीओ आपण सतत पाहत असतो. ज्यामध्ये बऱ्याचदा प्राणी, पक्षी यांच्या संदर्भातील विविध व्हिडीओ पाहायला मिळतात. मागील काही दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एका हरिणीने तिच्या पाडसाला वाचवण्यासाठी स्वतः मरण पत्करले होते. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये असंच काहीतरी पाहायला मिळत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका शेतामध्ये शेतकरी नांगरणी करत असून यावेळी त्याच्या शेतात एक टिटवी तिच्या अंड्यांचे रक्षण करण्यासाठी बसलेली दिसत आहे. शेतकरी नांगरणी करता करता तिच्या अंगावर ट्रॅक्टर घालेल अशी भीती तिला वाटते, ज्यामुळे ती पंख पसरून तिच्या अंड्यांचे रक्षण करण्यासाठी सज्ज होते. यावेळी ती तिच्या जिवाचीही पर्वा करत नाही. शेतकरीदेखील टिटवीला पाहतो. तिला त्रास होऊ नये म्हणून तो टिटवी बसलेल्या ठिकाणी नांगरणी करणं थांबवतो. हा सुंदर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
हा व्हिडीओ शेअर करणाऱ्या व्यक्तीने कॅप्शनमध्ये, “एका आईची आपली अंडी वाचवण्याची धडपड आणि शेतकऱ्याचे निसर्गासोबत असलेले अतूट नाते, दोन्ही गोष्टी या एकाच व्हिडीओमध्ये पाहायला मिळतात.”
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ X (ट्विटर) वरील @socialkatta91 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्याशिवाय या व्हिडीओला आतापर्यंत एक लाखांहून अधिक व्ह्यूज आणि दहा हजारांहून अनेक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच त्यावर अनेक जण कमेंट्स करतानाही दिसत आहेत. एकानं लिहिलंय की, “व्हिडीओ काढणाऱ्याला एकवीस तोफांची सलामी.” दुसऱ्याने लिहिलंय की, “या मातेला हिरकणीच म्हणावं लागेल”, तसेच आणखी एकाने लिहिलंय की, “आमच्या शेतामध्येही टिटवीची अंडी व पिल्ले असतात व ते खरोखर रक्षण करण्यासाठी खूप जोर लावतात; मग आम्ही त्यांच्यासाठी नांगर थांबवतो.”