Viral Video : देशभरात सध्या विविध परीक्षा सुरू आहेत, त्यामुळे शिक्षक परीक्षांच्या कामात व्यस्त आहेत. या शिक्षकांवर परीक्षांनंतर उत्तरपत्रिका तपासण्याचे एक मोठे काम असते. अनेक शाळांत ऑब्जेक्टिव प्रश्नांसह परीक्षा घेतल्या जातात. पण, या ऑब्जेक्टिव परीक्षांचे पेपर तपासण्यात शिक्षकांना अनेक तास लागतात, त्यामुळे अशा बहुपर्यायी प्रश्नपत्रिका तपासण्यासाठी एका शिक्षकाने भन्नाट जुगाड शोधून काढला आहे, ज्यामुळे त्याच्या काही सेकंदात अनेक प्रश्नपत्रिका तपासून पूर्ण होत आहेत.
अशाप्रकारच्या प्रश्नपत्रिकांमध्ये एक प्रश्न आणि त्याखाली उत्तरांचे ४ पर्याय दिलेले असतात. यातील योग्य उत्तराचा पर्याय निवडून तुम्हाला तो उत्तर पत्रिकेत दिलेल्या रकान्यात पेनाने गोल करुन भरायचा असतो.
दरम्यान शिक्षकांना अशाप्रकारच्या उत्तरपत्रिका तपासताना सर्व प्रश्नांची उत्तरं उत्तरपत्रिकेत योग्य रकान्यात भरली आहेत की नाहीत हे नीट तपासावे लागते. पण, व्हायरल व्हिडीओत एका शिक्षकाने अशा ऑब्जेक्टिव प्रश्नांच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी एक अनोखी पद्धत वापरली आहे, ज्यामुळे वेळेची तर बचत होतेच, शिवाय तपासणीदेखील सोपी होतेय.
व्हायरल झालेल्या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, एका शाळेच्या वर्गात एक शिक्षक डेस्कवर बसून परीक्षेची उत्तरपत्रिका तपासताना दिसत आहे. सर्व उत्तरपत्रिकेत प्रत्येक प्रश्नासाठी उत्तरांचे चार पर्याय आहेत. विद्यार्थ्याने प्रत्येक प्रश्नासाठी यातील योग्य पर्याय निवडून रकान्यात तो भरला आहे की नाही, हे तपासले जात आहे, यासाठी शिक्षकाने एका कागदावर सेम उत्तर पत्रिकेसारखी प्रिंट घेतली आहे, आणि प्रत्येक प्रश्नाच्या योग्य उत्तरावर छिद्र करुन ठेवला आहे.
शिक्षकांच्या मते, प्रत्येक उत्तरपत्रिका वाचण्यासाठी आणि तपासण्यासाठी खूप वेळ लागतो, त्यामुळे त्यांनी हा एक उपाय शोधून काढला, ज्याद्वारे संपूर्ण उत्तरपत्रिका फक्त काही सेकंदात सहज तपासता येतात.
या ऑब्जेक्टिव उत्तरपत्रिका तपासण्यासाठी, शिक्षकाने प्रिंट करुन सेम उत्तर पत्रिकेसारखा बनवलेला कागद घेतला, ज्यात प्रत्येक प्रश्नाचे योग्य उत्तरावर एक बारीक छिद्र केला, यानंतर छिद्र केलेला तो कागद प्रत्येक विद्यार्थ्याच्या उत्तरपत्रिकेवर ठेवला आणि नीट सेट केला.
यात विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेत भरलेले वर्तुळ योग्य उत्तराच्या छिद्रातून दिसत असेल तर त्याचा अर्थ असा की, त्याने किंवा तिने योग्य उत्तर चिन्हांकित केले आहे. म्हणजेच जे उत्तर छिद्र असलेल्या वर्तुळाशी जुळते, अशाप्रकारे शिक्षक योग्य रकान्यात भरलेली उत्तरं मोजतो आणि गुण देतो.
उत्तरपत्रिका तपासण्यासाठी शिक्षकाचा जुगाड
उत्तरपत्रिका तपासण्याचा शिक्षकाचा हा भन्नाट जुगाड व्हिडीओ @pintu5364 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, जो आत्तापर्यंत लोकांनी पाहिला आणि त्यावर कमेंट्स केल्या. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘पहिल्यांदाच मला कॉपी तपासण्यात खूप अडचणी आल्या आणि त्यात खूप वेळही लागला. मग मी निन्जा टेक्निक वापरली. आता मी ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांच्या उत्तरपत्रिका खूप सहजपणे आणि खूप कमी वेळेत तपासू शकतो. पण, उत्तरपत्रिका तपासण्याची ही पद्धत तुम्हाला कशी वाटली ते सांगा.