राज्यात सध्या सत्तासंघर्ष सुरु असून नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. यावेळी काही नेते आक्षेपार्ह विधानं करत असून यामुळे वादही निर्माण होत आहेत. एकीकडे राजकारण ढवळून निघत असताना सर्वसामान्य राजकारणाची पातळी खालावली असल्याने नाराजी जाहीर करत आहेत. बंडखोर शिंदे गटाला प्रत्युत्तर देण्यामध्ये शिवसेनेकडून संजय राऊत आघाडीवर आहेत. त्यातच आता त्यांचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दिवंगत वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांनी दूरदर्शनवर संजय राऊत यांची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीमधील १० सेकंदाची व्हिडीओ क्लिप व्हायरल होत आहे. संजय राऊत यांचा हा व्हिडीओ राजकारणात येण्यापूर्वीचा आहे. यामध्ये संजय राऊत राजकारण म्हणजे गटार असल्याचं सांगत आपलं मत मांडताना दिसत आहेत.
Pradeep Bhide Death : प्रदीप भिडे यांचं निधन; दूरदर्शनवरील बातम्यांचा बुलंद आवाज हरपला
प्रदीप भिडे यावेळी ‘तुम्ही राजकारणात कधी जाणार?’ असा प्रश्न विचारला होता. यावर उत्तर देताना संजय राऊतांनी “तुम्ही गटारात कधी उडी मारणार असं थेट का विचारत नाही?” असा प्रतिप्रश्न केला होता. यानंतर ते हसतानाही दिसत आहेत.
वादग्रस्त वक्तव्यानंतर संजय राऊतांचं आज नवं ट्वीट
संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांसंबंधी केलेल्या एका वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. गुवाहाटीला गेलेले आता जिवंत प्रेतं आहेत आणि ही जिवंत प्रेतं आता मुंबईत येतील, तेव्हा त्यांना थेट शवागृहात पोस्टमोर्टमसाठी पाठवू असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. संजय राऊतांच्या या वक्तव्यावरुन एकच गदारोळ सुरु झाला होता. त्यातच आता संजय राऊत यांनी आणखी एक ट्वीट केलं असून ते चर्चेत आहे.
संजय राऊत यांनी एक पोस्ट ट्विटरला शेअर केली आहे. यामध्ये लिहिण्यात आलं आहे की, “अगतिकता एक प्रकारचा मृत्यूच आहे आणि अगतिक लोक चालते फिरते मृतदेहच असतात”.
राऊत नेमकं काय म्हणाले होते?
रविवारी म्हणजेच २६ जून २०२२ रोजी सकाळी शिवसेनेच्या मेळाव्यात बोलताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी वादग्रस्त विधान केलं होतं. गुवाहाटीहून ४० आमदारांचे मृतदेह मुंबईत येतील व त्यांचे शवविच्छेदन होईल, असे विधान संजय राऊत यांनी केले होते. त्यावरून मोठा वाद सुरू झाला. त्यावर संध्याकाळी राऊत यांनी सारवासारव केली. आमदारांनी आत्मा विकल्याने जे उरले ते केवळ त्यांचे जिवंत शरीर मृतदेहासारखेच आहे. आता त्यांचे विधानभवनात विच्छेदन होईल, असा माझ्या विधानाचा अर्थ असल्याचा खुलासा राऊत यांनी केला होता.