Video Shows Father Feed Chicken To 30 Cats : आपल्यातील अनेकांना प्राणी पाळण्याची आवड असते. त्यात श्वान, मांजर हे अगदी विशेष. पण, ही स्वत:ची हौस भागवताना अनेक अडचणींचासुद्धा सामना करावा लागतो आणि बंधनंही घालून घ्यावी लागतात. परंतु, कुठे काही कामानिमित्त बाहेर जायचं झालं आणि घरी कोणीच नसलं तर या कुटुंबातल्या सदस्यांचा सांभाळ कोण करणार ही चिंता यातील सर्वांत मोठी अडचण वाटत असते. त्यामुळे अनेक जण भटक्या श्वान, मांजरींवर जीव लावताना दिसतात. त्यांना अगदी आठवणीने खाऊ-पिऊ घालतात; तर आज सोशल मीडियावर असेच काहीसे दाखविणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
दररोज मध्यरात्री ८० वर्षांचे हे आजोबा इस्त्री केलेल्या शर्ट-पँटमध्ये अर्धा किलोमीटरभर चालत त्यांच्या मांजरींना भेटायला येतात. तीन ते चार किलो शिजवलेले चिकन पिशवीतून घेऊन येतात. एखादी मोकळी जागा बघून, तेथील पाने झाडू मारून बाजूला काढतात. तोंडाला मास्क लावतात, हातमोजे घालतात आणि ३० हून अधिक मांजरींना दररोज रात्री खायला आणि दूध प्यायला देतात. एका अनोळखी व्यक्तीने २०२० मध्ये या माणसाला मांजरींना खाऊ घालताना पाहिले होते तेव्हा त्याने व्हिडीओ शूट करून घेतला होता. एकदा बघाच हा व्हिडीओ…
व्हिडीओ नक्की बघा…
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिले आहे की, आजोबा पिशवीतून चिकन घेऊन येत असतात. तेव्हा अनेक मांजरींना त्यांच्या येण्याची चाहूल लागते आणि त्या धावत-पळत त्या आपापल्या जागांवर जातात. अंधेरी पश्चिम येथे २०२० पासून ते आता २०२५ पर्यंत ८० वर्षांचे आजोबा दररोज त्यांच्या मांजरींना खाऊ घालायला येतात. ते पाहून अनोळखी व्यक्ती भारावून गेली आणि तिने व्हिडीओ शूट करून घेतला आणि “आपल्या जगाला अशा ‘मांजरमित्रांची’ आवश्यकता आहे”, अशी कॅप्शन दिली आहे.
अजूनही चांगुलपणा आहे (Viral Video) :
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @furacause.in या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘जेव्हा जेव्हा दिवस वाईट जातो तेव्हा तेव्हा मी या आजोबांचा विचार करते आणि स्वतःला आठवण करून देते की, जगात अजूनही दयाळूपणा आणि चांगुलपणा आहे – तुम्हाला फक्त अधूनमधून थांबावे लागेल आणि ते शोधावे लागेल’, अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरीसुद्धा हा व्हिडीओ पाहून आजोबांचे कौतुक करताना कमेंट्समध्ये दिसून आले आहेत.