Video Shows A Begging Child Fed Ice Cream To A Kitten : आपल्याला इतरांकडून जे अपेक्षित असते, तेच इतरांनाही आपल्याकडून अपेक्षित असते. काही माणसे खूश नसली की, इतरांनाही सुखाने जगू देत नाहीत; पण काही जण असेही असतात की, जे स्वतःकडे कमी असतानाही इतरांना भरभरून देण्याची क्षमता ठेवतात. घरात पाळीव प्राण्यांना आणणे किंवा भटक्या प्राण्यांना जवळ घेऊन त्यांना खाऊ घालणे, स्टेटसवर त्यांचे फोटो ठेवणे आदी गोष्टी केल्या म्हणजे तुम्ही प्राणीप्रेमी झालात का? तर नाही… पण, आज सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ (Video) तुमचे मत बदलेल एवढे तर नक्की…
रस्त्याकडेला पोटापाण्यासाठी भीक मागणारी अनेक मुले तुम्हालाही दररोज दिसत असतील. रोज त्यांना आपल्यासारखे दोन वेळचे खायलाही मिळत असेल की नाही याबद्दलही शंका असते. पण, आज व्हायरल व्हिडीओतील दृश्य पाहून तुम्ही भारावून जाल. कारण- या चिमुकलीला कोणीतरी एका ग्लासातून आइस्क्रीम दिलेले असते. पण, हे आइस्क्रीम ती एकटी न खाता, तिच्या कुशीत असणाऱ्या मांजरीच्या पिल्लालासुद्धा देते. एकदा बघाच डोळ्यांत पाणी आणणारा व्हायरल व्हिडीओ (Video) …
व्हिडीओ नक्की बघा…
व्हायरल व्हिडीओत (Video) तुम्ही पाहिले असेल की, भीक मागणारी एक चिमुकली रस्त्याकडेला बसलेली दिसते आहे. तसेच तिच्या मांडीवर एक लहानसे मांजरीचे पिल्लूसुद्धा बसलेले दिसते आहे. तिच्याजवळ सिंबा आणि कृष्णा ही मांजरीची दोन पिल्ले असतात. त्यांची आई वारल्यामुळे आता त्यांची जबाबदारी या चिमुकलीने घेतली आहे. या चिमुकलीच्या शेजारी एका ग्लासात आइस्क्रीम असते. ती आपल्या ग्लासातील एक चमचा आइस्क्रीम मांजरीच्या पिल्लाला भरवते आणि एक घास स्वतःसुद्धा खाताना दिसते आहे. पण, चिमुकली आपल्या ग्लासातील आइस्क्रीम स्वतः खायला जाते. तेव्हा मांजर तिचा हात पकडते आणि ‘मला भरव, असे इशाऱ्याने म्हणते’ मग एकाच चमच्याद्वारे दोघीही आइस्क्रीमचे सेवन करतात, जे पाहून तुम्हीही भारावून जाल.
‘पैशाने गरीब; पण मनाने श्रीमंत’
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @lifeofaaayuu या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत. एक चिमुकली ‘पैशाने गरीब; पण मनाने श्रीमंत’ असल्याचे दाखविणारा हा व्हिडीओ खूप चांगला आहे. पण, “मांजरीला आइस्क्रीम खायला देऊ नकोस” आदी अनेकविध कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्याचे दिसत आहेत.