Viral Video Shows Pet dog Minnie Travel in local train : मुंबईची लोकल ट्रेन, ज्यातून दररोज लाखो लोक एकत्र प्रवास करतात. रोज बसण्यावरून, ट्रेनमध्ये चढण्यावरून भांडण होतं असली तरीही इथे रोज वेगवेगळी नाती जोडली जातात आणि कधी कधी कित्येकांना अनपेक्षित आनंदाचे क्षणसुद्धा अनुभवायला मिळतात. तर आज असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये अलीकडेच असा एक क्षण उलगडला जेव्हा ‘मिन्नी’ नावाची एक प्रवासी, लोकल ट्रेनमध्ये चढून सहप्रवाशांबरोबर मजा-मस्ती करताना दिसली. कोण आहे ही प्रवासी चला जाणून घेऊ…

व्हायरल व्हिडीओ (Viral Video) मुंबई लोकलचा आहे. मुंबईच्या लोकल ट्रेनमधून एक महिला प्रवास करीत असते. प्रवासादरम्यान तिने बॅग पुढे लावलेली असते. पण, ही बॅग पाहून तुम्हालाही नवल वाटेल. महिलेच्या बॅगमध्ये तिची पाळीव श्वान ‘मिन्नी’ आरामात बसलेली दिसते आहे. बॅगमध्ये ठेवल्यामुळे ‘मिन्नी’ला तिचे डोके बाहेर टाकून, आजूबाजूला टुकू-टुकू बघण्याचा आनंद घेता येत येत होता. अर्थात, आपल्या पाळीव श्वानामुळे कोणत्याही प्रवाशाला त्रास किंवा भीती वाटणार नाही याची त्या महिलेने पूर्ण काळजी घेतली होती. परंतु, गाडीत आलेल्या या खास प्रवाशाला पाहून इतर महिला प्रवाशांची प्रतिक्रिया काय होती ते व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…

हेही वाचा…‘प्रेमाची सावली…!’ सुरकुतलेल्या हाताने नातीसाठी बनवली भाजी ; VIRAL VIDEO पाहून तुम्हाला आठवेल तुमची आजी !

व्हिडीओ नक्की बघा…

गोल्डन रिट्रीव्हर मिन्नीला भेटा…

व्हायरल व्हिडीओत (Viral Video ) तुम्ही पाहिलं असेल की, बॅगमध्ये बसलेली श्वान इतर प्रवाशांकडे कुतूहलाने बघते आहे. श्वानाचा शांत स्वभाव व मनमोहक उपस्थिती यांमुळे प्रवाशांच्या चेहऱ्यावर हास्य विलसताना आणि इतर महिला प्रवासी तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करताना दिसले. त्याचप्रमाणे एक चिमुकली, एक तरुणी त्यांच्या दैनंदिन चिंता विसरून काही क्षणांसाठी का होईना मिन्नीबरोबर आनंदाचे क्षण लुटत आहेत. “मुंबई, जिथे स्थानिक लोक मैत्रीपूर्ण आहेत आणि त्यांचे श्वानदेखील… आमच्या ट्रेनमध्ये चढलेल्या, हृदय चोरणाऱ्या गोल्डन रिट्रीव्हर मिन्नीला भेटा”, अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @roshogollaa इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी व्हिडीओ पाहून त्यांच्या भावना व्यक्त करताना दिसले आहेत. एका युजरने कमेंट केली, “अशा गोंधळात असे क्षण तुम्हाला केवळ मुंबईतच सापडतील.” दुसरा म्हणतोय, “लोकांना विसरा, मी आता फक्त कुत्र्यांसाठी ट्रेन चालवणार आहे.” तिसरा म्हणतो, “म्हणूनच मला मुंबई आवडते” आदी अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी व्हिडीओखाली केल्या आहेत.