Viral Video: खूप दिवसांनी पाहुणे घरी येणार म्हटल्यावर आईची लगबग सुरू होते. काय करू आणि काय नको असं आईला वाटू लागतं. घरातील पसारा आवरण्यापासून ते अगदी सकाळच्या नाश्त्यापासून, संध्याकाळच्या चहापर्यंत त्यांच्यासाठी खायला काय करायचं याची यादी ती करू लागते. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओत घरी आलेल्या व्यक्तीचा कशा पद्धतीत पाहुणचार होतो हे दाखवण्यात आले आहे ; जो अनेकांची मनं जिंकून घेत आहे.
कंटेन्ट क्रिएटर दैनंदिन जीवनात घडणाऱ्या अनेक गोष्टी रीलद्वारे शेअर करून सगळ्यांना हसवत असतात. अलीकडेच एका कंटेन्ट क्रिएटरने पाहुण्यांना जेवण देताना भारतीयांची विशिष्ट पद्धत अगदी मनोरंजक पद्धतीने व्हिडीओत मांडली आहे. पाहुण्यांना जेवण वाढताना आपण कसा हुबेहूब संवाद साधतो, यादरम्यान कसे हावभाव करतो, जेवणाच्या ताटात त्यांना कोणते पदार्थ वाढतो हे व्हिडीओत दाखवलं आहे. पाहुण्याचा हा खास पाहुणचार तुम्हीसुद्धा व्हायरल व्हिडीओतून पाहा.हसून-हसून लोटपोट व्हाल एवढं तर नक्की…
व्हिडीओ नक्की बघा…
व्हिडीओची सुरुवात कंटेन्ट क्रिएटर, पाहुण्याला तुम्ही जेवायला कुठे बसणार ? असा प्रश्न विचारून होते. ‘आपलंच घर समजून जेवा, लाजू नका’ असे सांगत वारंवार पाहुण्यांना अजून काही ताटात वाढू का? असे विचारले जाते. त्यानंतर न विचारता, बळजबरीने ताटात गरम-गरम पोळी, भात वाढला जातो. अगदी व्यवस्थित पोट भरून खाल्लं तरीही पाहुण्याला ‘अहो तुम्ही तर काही जेवलातच नाही’; असे कंटेन्ट क्रिएटर बोलताना दिसत आहे. जेवण झालं आता घोटभर चहा घेऊया असेसुद्धा आवर्जून सांगताना दिसत आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ अंकुर अग्रवाल याच्या @ankur_agarwal_vines या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. कंटेन्ट क्रिएटरने त्याच्या मित्राबरोबर हा रील शूट केला आहे. अंकुर अग्रवाल हा युजर अनेकदा दैनंदिन जीवनात घडणाऱ्या भारतीय गोष्टी व्हिडीओत चित्रित करतो. पाहुणे घरी आले की त्यांना घरात किंवा बाहेरून आणलेल्या पदार्थांची चव आपण नक्कीच चाखायला देतो. त्यांना जेवणाचे ताटसुद्धा उचलायला देत नाही. एकूणच भारतीय घरांमध्ये पाहुण्यांचा पाहुणचार अगदी हटके पद्धतीत होतो. हा व्हिडीओ मनोजरंजनाच्या दृष्टीने बनवला असला तरीही यातील डायलॉग, हावभाव हे रोजच्या दैनंदिन जीवनाशी निगडित आहेत, असे म्हणायला हरकत नाही.