Viral Video Shows Baby Elephant Protect Its Mother : आपल्यातील अनेक जण जंगलातील प्राणी पाहण्यासाठी जंगल सफारी, नॅशनल पार्कमध्ये जातात. येथे सिंह, वाघ यांच्याबरोबरीने हत्ती पाहण्याचीही अनेकांना इच्छा असते. त्यामुळे हत्ती पर्यटकांच्या आकर्षणाचाच विषय ठरत आहेत. जगात हत्तींच्या फक्त दोन जाती आहेत. एक आशियाई हत्ती, दुसरे आफ्रिकन. आज दक्षिण आफ्रिकेतील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत पर्यटकांपासून आईचे संरक्षण करण्यासाठी हत्ती पर्यटकांचा सामना करीत त्यांचे मनोरंजन करताना दिसून आला आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये काही पर्यटक जंगल सफारीसाठी आले आहेत. पर्यटक रस्त्यात थांबले. कारण- त्यांना समोर एक दोन महिन्यांचे हत्तीचे पिल्लू आणि त्याची आई दिसली. पर्यटकांना पाहून ते दोन महिन्यांचे हत्तीचे पिल्लू जणू आईचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करताना दिसते. हत्तीचे पिल्लू मजेदारपणे दोन ते तीन वेळा पर्यटकांच्या गाडीसमोर जाऊन पुन्हा मागे येते. असे ते अनेकदा करते. ते पाहून पर्यटकसुद्धा हसू लागतात. पर्यटकांचे मनोरंजन करणाऱ्या हत्तीच्या या पिल्लाला व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा.
हेही वाचा…भटक्या श्वानांची दहशत; चिमुकल्यावर हल्ला करत अंगावर मारली उडी अन्… पाहा CCTV मध्ये कैद झालेलं दृश्य
व्हिडीओ पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा…
https://www.instagram.com/p/C739_PUIPHE/
हत्तीने केली पर्यटकांची गंमत :
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, हत्तीचे बाळ पर्यटकांचा ‘सामना’ करण्याचा प्रयत्न करते. पण, मधेच त्याच्या मनात काय येते माहीत नाही. ते त्वरित दिशा बदलते आणि त्याच्या आईकडे परत जाते. अशा प्रकारे हत्तीच्या पिल्लाने सुरुवातीला पर्यटकांना घाबरवले; पण ‘आपल्या कुटुंबाचे रक्षण’ करण्याच्या हेतूने असे करताना पर्यटकांचे मनोरंजनसुद्धा केले. आतापर्यंत तुम्ही हत्तीने पर्यटकांवर हल्ला केल्याचे अनेक व्हिडीओ पहिले असतील. पण, आजच्या व्हिडीओतील हत्ती व पर्यटकांची ही भेट तुमच्याही चेहऱ्यावर हसू आणेल एवढे नक्की…
सोशल मीडियावर हा व्हिडीओ या @tapestryofafrica इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. पर्यटकांनी हा व्हिडीओ शेअर करीत ‘दोन महिन्यांच्या हत्तीने आमच्यावर मजेशीर हल्ला केला’, अशी कॅप्शन या पोस्टला दिली आहे. तसेच या व्हिडीओतील हत्तीच्या मनात काय चालू असेल या संभाषणाचा संपादित करण्यात आलेला मजकूरही सोबत देण्यात आला आहे; जो हा व्हिडीओ आणखी मजेशीर बनवतो आहे. लहान हत्तीच्या धाडसाने केवळ नेटकऱ्यांचे मनोरंजनच केले नाही, तर या भव्य प्राण्यांच्या जन्मजात संरक्षणात्मक प्रवृत्तीवरही प्रकाश टाकला आहे