Viral Video Shows Car Pulled By Oxen : दिवसेंदिवस भारतात इलेक्ट्रिक गाड्या अन् बाईकची मागणी वाढू लागली आहे. पण, या इलेक्ट्रिक दुचाकी, गाड्यांना आग लागणे, त्यांचा स्फोट होणे, चार्ज करूनही रस्त्यात बंद पडणे आदी घटनांमुळे दिवसेंदिवस त्यांच्यामुळे धोका वा होणाऱ्या त्रासाने समस्याही वाढत चालल्या आहेत. तर आज सोशल मीडियावर याचसंबंधित एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये इलेक्ट्रिक कार भररस्त्यात बंद पडल्यामुळे जुगाड करण्यात आला आहे.
व्हायरल व्हिडीओ राजस्थानच्या डीडवानामधील आहे. डीडवाना जिल्ह्यातील कुचामन शहरातून एका विचित्र घटनेने लोकांना आश्चर्यचकित केले. कुचामन नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते अनिल सिंह मेडतिया यांची इलेक्ट्रिक कार रस्त्यात बिघडल्याने त्यांना अडचणीचा सामना करावा लागला. सहसा गाडी बंद पडल्यावर आपण आजूबाजूला उपस्थित असणाऱ्या इतर माणसांना धक्का देण्यास सांगतो. पण, त्यांनी गाडी ओढत नेली आणि त्यासाठी कोणत्या मार्गाचा अवलंब केला हे व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा नक्की बघा…
व्हिडीओ नक्की बघा…
तुम्ही व्हिडीओत पाहिले असेल की, दोन बैल दिसत आहेत. बैल जसजसे पुढे येतात तेव्हा दिसते की, गाडीला एक दोरी बांधून ती बैलगाडीला जोडली आहे. इलेक्ट्रिक कार बंद पडल्याने गाडी दोन बैलांच्या मदतीने ओढून नेली जाते आहे. तेथे उपस्थित एका अज्ञात व्यक्तीने या घटनेचा व्हिडीओ कॅमेऱ्यात शूट करून घेतला आहे आणि सोशल मीडियावर शेअर केला आहे.
अनिल सिंह मेडतिया यांनी (Medtia) उघड केले की, त्यांनी २०२३ मध्ये ही कार खरेदी केली होती. पण, तेव्हापासून त्यांना सतत काही ना काही समस्यांचा सामना करावा लागला. गेल्या वर्षभरात चक्क १६ वेळा सेवा केंद्राला (सर्व्हिस सेंटरला) भेट द्यावी लागल्याचा दावा त्यांनी केला आहे. पण, समस्या अद्याप काही सुटलेल्या नाहीत. एक प्रमुख तक्रार म्हणजे कार पूर्ण चार्ज केल्यानंतर जेवढे मायलेज द्यायला पाहिजे तितके प्रदान करण्यात ही कार अपयशी ठरते.
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @VinoBhojak या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ही घटना तीन ते चार दिवसांपूर्वी घडली होती. कार पूर्ण चार्ज होऊनही बंद पडली तेव्हा, जुगाड करून कार ओढण्यासाठी बैलांचा वापर करावा लागला. विशेष म्हणजे अशीच एक घटना नुकतीच धौलपूर जिल्ह्यातही घडली. वारंवार बिघाड होऊनही कंपनीकडून मदत न मिळाल्याने निराश झालेल्या शेतकऱ्याने आपला ट्रॅक्टर पेटवून दिला. या घटनांमुळे काही वाहनांची विश्वासार्हता आणि उत्पादकांची जबाबदारी याबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत.