रंगमंचावर डान्स करणे, एखादे नाटक सादर करणे जितके उत्साहाचे असते, तितकेच ते भीतीदायकसुद्धा असते, कारण प्रेक्षक आपल्या सादरीकरणाला कसा प्रतिसाद देतील, आपण चुकलो तर हसतील, आपला डान्स चांगला नसेल तर कंटाळून निघून जातील; याबद्दल प्रत्येक व्यक्तीच्या मनात भीती असते. पण, आज सोशल मीडियावर काहीतरी वेगळंच चित्र पाहायला मिळालं आहे. डान्सदरम्यान स्पीकर बंद पडल्यामुळे प्रेक्षकांनी एका तरुणीला अनोखा प्रतिसाद दिला आहे.

व्हायरल व्हिडीओ दिल्ली विद्यापीठच्या इंद्रप्रस्थ कॉलेज फॉर वुमन (IPCW) येथील आहे. कॉलेजमध्ये एक कार्यक्रम सुरू असतो. या कार्यक्रमात श्रिया राठी या विद्यार्थिनीचा डान्स परफॉर्मन्स सुरू असतो. ‘आफरीन आफरीन’ गाणं सुरू होतं आणि विद्यार्थिनी डान्स करण्यास सुरुवात करते. पण, तितक्यात काही तांत्रिक अडचणींमुळे स्पीकर खराब होतो. विद्यार्थिनी शिक्षिकेकडे पाहते आणि मान हलवते. शिक्षिका तिला प्रोत्साहन देत डान्स सुरू ठेवण्यास सांगते. यादरम्यान प्रेक्षक काय करतात, व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…

हेही वाचा…VIRAL VIDEO : ‘आनंद पोटात माझ्या मावेना…!’ बाबांनी वाढदिवसाला दिलं असं हटके गिफ्ट की… लेक आनंदाने मारू लागला उड्या

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, स्पीकर खराब झाल्यामुळे विद्यार्थिनी नाराज होते. पण, प्रेक्षकांनी दिलेला प्रतिसाद पाहून ती थक्क होऊन जाते. कारण कार्यक्रमासाठी जमलेले प्रत्येक जण विद्यार्थिनी श्रियासाठी ‘आफरीन आफरीन’ गाणं गाण्यास सुरुवात करतात. हे पाहून जिथून डान्स थांबवण्यात आला तिथूनच पुन्हा सुरू झाला. प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून शिक्षक व कॉलेजचे विद्यार्थी टाळ्या वाजवताना दिसत आहेत आणि असा खास कार्यक्रम सुरळीत पार पडला आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @shreeaa.rathi या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘इंद्रप्रस्थ कॉलेज फॉर वुमन कॉलेजचे बेस्ट प्रेक्षक’ अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून नेटकरीसुद्धा भारावून गेले आहेत. एका नेटकऱ्याने कमेंट केली आहे की, ‘पडत्या काळात साथ देणारी अशी माणसं मलासुद्धा हवी’, तर दुसरा म्हणतोय की, ‘तिची डान्स करण्याची एनर्जी पाहून प्रेक्षकांनासुद्धा उत्साह आला’; आदी अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.