Viral Video Of Vintage Premier Padmini Car : स्वप्न सगळेच पाहतात, पण ती सत्यात उतरवण्याची जिद्द फार थोड्या लोकांमध्ये असते. आवडत्या क्षेत्रात शिक्षण, मग नोकरी करून स्वतःचे घर विकत घेणे आणि त्या घराबाहेर हक्काची चारचाकी किंवा दुचाकी गाडी उभी असणे हे आपल्या प्रत्येकाचे स्वप्न असते. सध्या सर्वत्र मॉडर्न म्हणा किंवा महागड्या गाड्या वर्चस्व गाजवत आहेत. पण, आपल्यातील अनेकांना व्हिंटेज कारसुद्धा भरपूर आवडतात. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामुळे एका महिलेने तिचे लहानपणीचे स्वप्न पूर्ण करत एक व्हिंटेज कार खरेदी केली आहे.
व्हायरल व्हिडीओ (Video) बंगळुरूमधील आहे. बंगळुरू स्थित रचना महादिमाने (Rachana Mahadimane) हिने तिच्या वाढदिवसानिमित्त व्हिंटेज प्रीमियर पद्मिनी (Premier Padmini) कार खरेदी केली आहे. एकेकाळी भारताचे प्रतीक असलेली प्रीमियर पद्मिनी ही कार केवळ गेलेल्या युगाचेच प्रतिनिधित्व करत नाही तर रचना महादिमाने हिच्या बालपणीच्या आठवणींमध्येही तिचे विशेष स्थान आहे. तर हाच अनुभव तिने इन्स्टाग्रामवर एका व्हिडीओमध्ये शेअर केला, जो तुम्हीसुद्धा नक्की बघा…
व्हिडीओ नक्की बघा…
व्हायरल व्हिडीओत (Video) तुम्ही पाहिले असेल की, रचना महादिमाने हिला तिच्या स्वप्नातील गाडी कशी सापडली याचा तिने उल्लेख केला आहे. गेल्या दोन वर्षांपासून अनेकदा तिच्या आजूबाजूला प्रीमियर पद्मिनी कार दिसायची, तेव्हा या कारचे चित्रसुद्धा तिने एका कागदावर रेखाटून ठेवले आणि गॅरेजमध्ये काम करणाऱ्या कामगारांनी तिचे हे स्वप्न सत्यात उतरवले. काही महिन्यांपूर्वी वर्कशॉपमध्ये प्रीमियर पद्मिनीची बारकाईने दुरुस्ती करण्यात आली. त्यानंतर पावडर ब्लू पेंट नंतर, व्हिंटेज कार पुन्हा तिच्या पूर्वीच्या लूकमध्ये दिसू लागली आणि ही कार तिने खरेदी केली.
माझ्या स्वप्नातील कार…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ (Video) @rachanamahadimane या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘मी स्वतःला चिमटा काढत आहे, कारण मी माझ्या वाढदिवसासाठी एक कार खरेदी केली. ही माझ्या स्वप्नातील कार आहे. मी लहानपणापासून ही कार घेण्याचे स्वप्न पाहत होते. वर्षाचा शेवट एका हाय नोटवर झाला (high note) ! यापेक्षा अधिक चांगले काय होऊ शकते का? @jaws__garage यांचे विशेष आभार!’ अशी कॅप्शन तिने या व्हिडीओला दिली आहे.