Viral Video Shows Indian Railways Announcement Voice :रेल्वे प्रवास हा केवळ वाहतुकीचा एक मार्ग नाही; तर आठवणींचा एक संग्रह आहे, असं म्हणायला हरकत नाही. प्लॅटफॉर्मची रचना, प्लॅटफॉर्मवर असणारे बेंच, तेथील खाद्यपदार्थांची दुकाने, ट्रेनचा हॉर्न, इंडिकेटर, ट्रेनची वाट बघणारे प्रवासी आणि सगळ्यात खास तर रेल्वेस्थानकावरील ट्रेनसंबंधित घोषणा. हा एक आवाज आहे, जो तुमच्या कायम लक्षात राहतो. बोलणाऱ्या व्यक्तीचा चेहरा जरी दिसत नसला तरीही मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेत रेल्वेस्थानकावर ध्वनिवर्धकावर हा आवाज ऐकू येत असतो. तर, आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत आहे आणि त्यामध्ये या आठवणींना पुन्हा एकदा एका ट्विस्टसह उजाळा देण्यात आला आहे.
रीलमध्ये कार्टूनमार्फत एका महिलेला मायक्रोफोनवर बोलताना दाखवलं आहे. आपल्या सगळ्यांना माहीत असलेल्या आणि आपण दररोज ऐकतो त्या रेल्वे घोषणांची ॲनिमेटेड नक्कल केली जात आहे. आनंद विहार ते कानपूर यादरम्यान धावणाऱ्या ट्रेनला उशीर झाला आहे, असे अपडेट्स ती अगदी अचूकपणे आणि मजेशीर पद्धतीने देते आहे. त्यामध्ये काही शब्दांमधे अंतर, त्याचे ताल, सूर, गाडीचा नंबर सांगण्याची स्टाईल अगदी ॲनिमेटेड कार्टूनमार्फत मायक्रोफोनवर अगदी अचूक बोलून दाखवली गेली आहे. कशा प्रकारे घोषणा (अनाउन्समेंट) देण्यात आल्या आहेत ते व्हायरल व्हिडीओतून (Viral Video) तुम्हीसुद्धा बघा…
हेही वाचा…लाडक्या बाबाला जेव्हा बक्षीस मिळतं, लेकीच्या डोळ्यात पाणी येतं; पाहा हृदयस्पर्शी VIRAL VIDEO
व्हिडीओ पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा…
https://www.instagram.com/reel/DCvSCOPiJTi/?igsh=cnFxODZnaTJ2MGU%3D
कृपया लक्ष द्या
तुमच्यातील अनेकांनी लहानपणी या अनाउन्समेंट घरी बोलण्याचा खूपदा प्रयत्न केला असेल. तसेच बदलत्या काळानुसार आजच्या बहुतेक घोषणा या रेकॉर्ड केलेल्या असतात आणि त्यात मानवी स्पर्श नसतो. पण, आज या ॲनिमेटेड पात्राने पुन्हा एकदा भारतीय रेल्वे प्रवासाशी संबंधित असलेल्या जुन्या आणि मानवी स्पर्श असलेल्या अनाउन्समेंटची आठवण करून दिली आहे. @nayanidixitt’s या इन्स्टाग्राम युजरने काही वर्षांपूर्वी ज्या प्रकारे अनाउन्समेंट केल्या जायच्या त्याची एक रील तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केली गेली आहे आणि याच युजरचा आवाज वापरून, या ॲनिमेटेड कार्टूनला जोडून हा खास व्हिडीओ युजर्ससाठी पोस्ट केला आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @nayanidixitt’s आणि @ideas_rolling’s या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. “एआयदेखील भारतीय रेल्वेच्या अनाउन्समेंट इतक्या अचूकपणे बोलू शकत नाही”, “माझं वय कितीही असलं तरी ‘यात्रीगण कृपया ध्यान दिजिए’ ऐकून मला नेहमी प्लॅटफॉर्मचा गोंधळ आठवू लागतो” आदी अनेक मजेशीर कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.