Viral Video Shows Woman Cuts Birthday Cake Filled With Rs 500 Notes : वाढदिवसाला एखाद्याला काय गिफ्ट द्यायचं, असा प्रश्न आपल्यातील अनेकांच्या मनात असतो. त्यातच जर एखाद्या मैत्रिणीला गिफ्ट द्यायचं असेल, तर आपण ड्रेस, मेकअपचे सामान असे काहीतरी देण्याचा विचार करतो. पण, आज काही मित्रांनी त्यांच्या मैत्रिणीला आश्चर्याचा धक्का दिला आहे, असे म्हणायला हरकत नाही. कारण- काही मित्रांनी मिळून त्यांच्या मैत्रिणीचा वाढदिवस तर केला; पण तो सेलिब्रेट करताना जे गिफ्ट दिलं, ते अगदी थक्क करणारं आहे. नक्की काय गिफ्ट दिलं आहे ते चला पाहूया…
व्हायरल व्हिडीओची (Viral Video) सुरुवात वाढदिवसाच्या सेलिब्रेशनने होते आहे. सगळे मित्र आजूबाजूला उभे असतात आणि मधे त्यांची लाडकी मैत्रीण उभी असते. मैत्रिणीसाठी केक तर आणलेला असतो; पण हा केक खूप जास्त खास असतो. कारण- हा केक ५०० रुपयांच्या नोटांसह बनवलेला असतो. केक कापून झाल्यानंतर हॅप्पी बर्थडे टॅग जेव्हा तरुणी केकवरून ओढण्यास सुरुवात करते. तेव्हा त्या केकबरोबर जोडलेल्या ५०० रुपयांच्या नोटासुद्धा बाहेर येतात. किती रुपये तरुणीला भेट म्हणून देण्यात आले ते व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा.
व्हिडीओ नक्की बघा…
५०० रुपयांच्या २९ नोटा
व्हायरल व्हिडीओत (Viral Video) तुम्ही पाहिलं असेल की, एकापाठोपाठ एक ५०० च्या नोटा केकमधून बाहेर पडू लागल्या. या ५०० च्या नोटा प्लास्टिकने व्यवस्थित झाकून पॅक करून ठेवल्या होत्या; जेणेकरून त्यांना केक लागणार नाही. या नोटा त्या केकमधून एकामागून एक बाहेर पडतच होत्या. एकामागून एक येणाऱ्या नोटा संपतच नसल्यामुळे तरुणीदेखील एका क्षणासाठी स्तब्ध झाली. अखेर नोटा खेचणं थांबलं आणि एकूण ५०० रुपयांच्या २९ नोटा त्यात होत्या हे सिद्ध झालं. त्याचप्रमाणे या नोटा मिळून १४,५०० रुपये झाले असतील, असादेखील अंदाज करण्यात आला. नंतर मैत्रिणीला या पैशांची माळ गळ्यात घालण्यात आली आणि अशा प्रकारे वाढदिवस दणक्यात सेलिब्रेट करण्यात आला.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @pratikshajadhav774 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘बर्थडे बॅश #अनपेक्षित क्षण. माझे नाव प्रतीक्षा आहे; लीलावती नाही. माझे मित्र मला लीलावती या नावाने मला चिडवतात’, अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरीसुद्धा हा व्हिडीओ पाहून थक्क झाले आहेत. एका युजरने कमेंट केली आहे, “माझा पगार एका केकमध्ये आहे.” दुसरा म्हणतोय, “तुम्ही पैशाच्या गिफ्टमुळे नव्हे, तर टीमच्या या प्रेमामुळे लकी आहात. असे मित्र कुठे भेटतात यार.” तिसरा म्हणतोय, “हा केक आहे की एटीएम. दिवाळीचा बोनस दिला.” आदी अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी व्हिडीओखाली केल्याचे पाहायला मिळत आहेत.