Video Shows Chawl Members Move Into Flat : जो माणूस चाळीत राहिला, तोच खऱ्या अर्थाने आयुष्य जगायला शिकला, असे म्हणतात. कारण- येथे घरच्यांपेक्षा जास्त काळजी घेणारे शेजारी, एखादा कार्यक्रम असेल, तर सगळ्या घरात उत्साह, एखादे संकट आले, तर धावून जाणारी अनेक माणसं या चाळीत असतात. आपण चाळीतल्या या छोट्याशा घरात राहून इमारतीमध्ये घर घेण्याचे स्वप्न पाहतो. पण, जेव्हा चाळीतले घर सोडून इमारतीमध्ये राहण्याची वेळ येते. तेव्हा मात्र डोळ्यांत पाणी आल्याशिवाय राहत नाही. तर, सोशल मीडियावर हेच दृश्य दाखविणारा एक व्हिडीओ (Video) व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडीओ (Video) दादरचा आहे. एक कुटुंब जवळजवळ १९७६ ते २०२४ दरम्यान दादर-पूर्व नायगाव बीडीडी चाळीत राहत होते. पण, या कुटुंबाला इमारतीमध्ये खोली मिळणार आहे किंवा ते चाळ सोडून त्यांनी घेतलेल्या इमारतीतील खोलीमध्ये शिफ्ट होणार आहेत, असे दिसते आहे. बाबा घराला कुलूप लावत आहेत आणि घराचा उंबरठा आणि दरवाजा यांच्या पाया पडताना दिसत आहेत. त्यानंतर आई-बाबा हातात हात पकडून घराचा निरोप घेताना दिसत आहेत. त्यांनी कशा प्रकारे चाळीतल्या घराचा निरोप घेतला आहे ते व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा नक्की बघा…

व्हिडीओ नक्की बघा…

कृतज्ञता व्यक्त करणारी ही शेवटची पिढी

तुमच्यातील अनेकांच्या आयुष्यात व्हायरल व्हिडीओतील हा क्षण नक्कीच आला असेल. आवडीची माणसे, आवडीचे घर सोडून जाणे वाटते तितके सोपे नसते. ज्या घराने मोठी स्वप्ने बघायला प्रेरित केले. मोठ्या घरात राहायचे स्वप्न पूर्ण केले. त्या चाळीतल्या घराची आठवण मात्र आपल्याला सातत्याने येत राहते आणि तेथेच सुख दडले होते, असे सारखे वाटू लागते. त्यामुळे ज्या घराच्या आठवणी मनात दाटल्या आहेत, ते घर सोडून जाताना प्रत्येकाला रडू कोसळते. व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, त्या आई व बाबांचीसुद्धा अशीच काहीशी परिस्थिती आहे.

सोशल व्हायरल होणारा हा व्हिडीओ @poonampatil912 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरीसुद्धा हा व्हिडीओ पाहून भावूक झाले आहेत आणि “या मुंबईमध्ये जर मराठी माणूस कुठे स्वाभिमान, आनंदाने आणि स्वतंत्रपणे जगला असेल किंवा जगत असेल, तर ते एकच ठिकाण आहे चाळ”, ‘हे दुःख एक चाळीत राहणाराच समजू शकतो”, “छान वाटलं; आम्हीपण चाळीच्या घरातून फ्लॅटमध्ये आलो, त्या क्षणाची आठवण आली”, “असा अनुभव आम्ही घेतला आहे”, “असे स्थलांतर कुणाच्या वाटेला येऊ नये”, “जुने घर सोडून आम्ही मोठ्या घरात येऊन २० वर्षे लोटली; पण हे नवीन घर अजून घरच वाटत नाही”, “कृतज्ञता व्यक्त करणारी ही शेवटची पिढी” आदी अनेकविध कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

Story img Loader