Video Shows Children Played A Fantastic Game On The Rope : जत्रा म्हटले की विविध दुकानं, झुले, आकाशपाळणे, खाण्याचे वेगवेगळे पदार्थ, उत्साही लोकांची गर्दी असे चित्र तुमच्या डोळ्यांसमोर येत असेल. तसेच लहान मुले तर फक्त झुले, आकाशपाळणे, पाळणे आदी गोष्टींवर बसायला जत्रेत जातात. कारण लहान मुलांना पाळण्याचे प्रचंड वेड असते, त्यामुळे अनेक जण आपल्या घरात स्विंग तर काही जण कापडाचा पाळणा, झाडाच्या पारब्यांचा झोका तर काही जण लाकडाची फळी किंवा टायर बसवून त्याला दोरी जोडून झोका घेतात. पण, आज सोशल मीडियावर काहीतरी वेगळे पाहायला मिळाले आहे.
व्हायरल व्हिडीओ (Video) बहुतेक गावाकडचा आहे. व्हिडीओतील चिमुकल्यांना पाळण्याचा आनंद घ्यायचा असतो, तर यासाठी त्यांनी जबरदस्त जुगाड केलेला दिसतो आहे. नाल्याला लागून एक झाड असते आणि नाल्याच्या बाजूला एक कठडासुद्धा असतो, तर या झाडाला काही दोऱ्या बांधून विद्यार्थी मजेशीर खेळ खेळताना दिसत आहेत. या बांधलेल्या दोऱ्याच्या सहाय्याने प्रत्येक मुलं धावत कठड्यावरून जातात आणि हवेत तरंगून पुन्हा गोल फिरून कठड्यावर येतात. एकदा बघाच डोकं लावून बनवलेला हा पाळणा.
व्हिडीओ नक्की बघा…
तुम्हीसुद्धा अनेकदा गावी गेल्यावर वडाच्या झाडाच्या खाली येणाऱ्या पारंब्याचा उपयोग झोका घेण्यासाठी नक्कीच केला असेल, तर आज व्हायरल व्हिडीओतसुद्धा (Video) असेच काहीसे पाहायला मिळाले. जसा जत्रेत आकाशपाळणा गोल-गोल फिरतो, अगदी तसेच दोरीच्या साहाय्याने ही मुले गिरक्या घेताना दिसत आहेत. तसेच प्रत्येकाने आपला तोल सांभाळून, स्वतःचे संरक्षण करून, कोणालाही पडू न देता अगदी खास पद्धतीत हा खेळ सुरू ठेवला आहे. तसेच या मुलांमधील ताळ-मेळ तर अगदी बघण्यासारखा आहे.
हा खरा खेळ आणि हे खरे खेळाडू…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @kamalsingh_92 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी व्हिडीओ पाहून बालपणीच्या आठवणीत रमून गेले आहेत आणि “तू मला माझ्या बालपणीची आठवण करून दिलीस”, “झाडे का वाढवावी याचे आणखीन एक उदाहरण, हा खरा खेळ आणि हे खरे खेळाडू, याच्यापुढे जगातील सर्व आकाशपाळणे फिके, मीसुद्धा लहानपणी असे केले आहे” आदी कौतुकास्पद, तर अनेक जण “तुम्ही स्वतःची काळजीसुद्धा घेतली पाहिजे”, आदी अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.